नवी मुंबई: शवागारात ठेवण्यात आलेला आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या पालकांना २ हजाराची लाच मागितली गेल्याचा धक्कादायक प्रकार मनपा रुग्णालयात घडला आहे. याबाबत माहिती मिळताच मनसेने आंदोलन करीत मनपा रुग्णालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. घडलेला प्रकार निंदनीय असल्याची कबुली देत संबंधित कामगाराला तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे मनपाचे प्रथम संदर्भ रुग्णालय असून रुग्णालय आवारातच शवागार आहे. शहरात एका बावीस वर्षीय मुलीचा अकाली मृत्यू झाला होता. तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास मृतदेह प्रथम संदर्भ रुग्णालयात आणण्यात आला होता. मृतदेहाची तपासणी करून तो शवागारात ठेवण्यात आला होता. आज आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक आले असता येथील कामगाराने २ हजार रुपयांची लाच मागितली. शेवटी विटंबना टाळण्यासाठी २ हजार रुपये त्या कामगाराला देण्यात आले. तेव्हाच त्याने मृतदेह व्यवस्थित पणे नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांच्या कानावर आल्यावर वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे आणि अन्य मनसैनिकांनी रुग्णालय प्रशासकाच्या दालनात आंदोलन करीत अधिकाऱ्यांना मृतदेहावर टाकण्यात येणारा श्वेत कापड देण्यात आले. याबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांना विचारणा केली असता घडलेल्या प्रकार खरा असून अतिशय निंदनीय आहे. आम्ही तात्काळ संबंधित कामगाराला बडतर्फ केले आहे. अशी माहिती दिली.