नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३०ए येथील के. रहेजा कॉर्पच्या प्रसिद्ध ‘इनऑर्बिट मॉल’ आणि हॉटेल प्रकल्पाचे पाडकाम करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा २०१४ मधील आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. प्रकल्प पाडण्याऐवजी आर्थिक भरपाई स्वीकारून भूखंडाचे नियमितीकरण करण्याचा निर्णय न्यायालयाने मंगळवारी (२६ मे) दिला. न्यायमूर्ती पमिदिघंतम श्री नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने सार्वजनिक हित आणि ‘प्रमाणबद्धतेचा सिद्धांत’ विचारात घेऊन विकासक, व्यापारी आणि हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
सिडकोने सप्टेंबर २००३ मध्ये सुमारे ३०,५८२ चौ. मीटरचा हा भूखंड थेट वाटपाद्वारे के. रहेजा कॉर्पला दिला होता. हा भूखंड सुरुवातीला आयटी पार्कसाठी राखीव होता. मात्र नंतर धोरण बदलून तो व्यावसायिक वापरासाठी देण्यात आला. या वाटपाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये हे वाटप बेकायदेशीर ठरवत संपूर्ण प्रकल्प पाडण्याचे आणि जमीन सिडकोकडे परत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.
सुमारे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पात सुमारे ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून १५० हून अधिक किरकोळ विक्रेते येथे व्यवसाय करत आहेत. तसेच सुमारे ८,००० लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार या प्रकल्पावर अवलंबून आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अशा परिस्थितीत संपूर्ण बांधकाम पाडणे सार्वजनिक हिताला बाधक ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रशासकीय त्रुटी असल्या तरी इतक्या दीर्घ काळानंतर प्रकल्प तोडण्याऐवजी आर्थिक भरपाई घेऊन तो नियमित करणे अधिक योग्य ठरेल, असेही न्यायालयाने नमूद केले.
या निर्णयानुसार विकासकाला मुद्दल आणि व्याजासह एकूण ३१८.३१ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम नोव्हेंबर २०१४ मधील रेडी रेकनर दरांवर आधारित आहे आणि बांठिया समितीच्या सूत्रानुसार निश्चित करण्यात आली आहे. विकासकाने मूळ भूखंडासाठी भरलेली रक्कम यात समायोजित केली जाणार आहे. तसेच भूखंडावर अपेक्षित ‘जपानी गार्डन’ विकसित न केल्याबद्दल अतिरिक्त १ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम चार महिन्यांच्या आत सिडकोकडे जमा केल्यास भूखंडाचे नियमितीकरण लागू होईल, अन्यथा निर्णयाचा लाभ रद्द होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकल्पाशी संबंधित प्लॉट क्र. ३९/१६ च्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा या निकालाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला असून त्यावर मुंबई उच्च न्यायालय स्वतंत्रपणे निर्णय घेणार आहे. मात्र, या निर्णयामुळे वाशीतील या महत्त्वपूर्ण व्यावसायिक प्रकल्पाचे भवितव्य निश्चित झाले असून हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
