नवी मुंबई : नवी मुंबईतील रुग्णालयांच्या राजकारणाला आता आणखी एक रंजक वळण मिळाले आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या महत्त्वाकांक्षी सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकल्पाला विरोध होत असतानाच वाशीतील दोन मोठ्या भूखंडांवर थेट आधुनिक मनोरुग्णालय सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नगरसेवक किशोर अशोक पाटकर यांनी सेक्टर १९-एफमधील भूखंड क्रमांक १ आणि ५ मोकळे असल्यास ते महापालिकेने सिडकोकडून ताब्यात घ्यावेत आणि त्या ठिकाणी आधुनिक मनोरुग्णालय उभारावे, असा ठराव सप्टेंबरच्या महासभेत मांडण्यासाठी महापालिका सचिवांकडे पत्र दिले आहे.
सध्या शहरात एका मोठ्या रुग्णालयाच्या प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले असताना त्यात आता ‘मनोरुग्णालय’ या विषयाची भर पडल्याने आगामी महासभेत या मागणीची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. अर्थात, मनोरुग्णालयाची गरज मांडण्यामागे नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा असल्याचे पाटकर यांनी आपल्या ठरावात स्पष्ट केले आहे.
मात्र, मनोरुग्णालय उभारण्यापूर्वी या दोन भूखंडांची नेमकी स्थिती काय, हा प्रश्नही पाटकर यांनी उपस्थित केला आहे. २ सप्टेंबर रोजी आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी भूखंड क्रमांक १ आणि ५ सिडकोने कोणत्या वापरासाठी आणि कोणत्या संस्था किंवा सभासदांना दिले होते, याची माहिती मागितली आहे. या भूखंडांची सध्याची कायदेशीर व प्रत्यक्ष स्थिती, संबंधित सभासदांची यादी, ठराव तसेच अन्य नोंदी महापालिकेकडे उपलब्ध आहेत का, याबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
या भूखंडांवर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे का, परवानगी देताना सिडकोचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते का, असा सवालही करण्यात आला आहे. ना-हरकत प्रमाणपत्र नसताना परवानगी दिली असल्यास ती कोणत्या नियमाच्या आधारे देण्यात आली, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. भूखंडाची ‘नो ड्यूज’ रक्कम पूर्णपणे भरलेली नसल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरोधात कोणती कारवाई करण्यात आली, याची माहितीही पाटकर यांनी मागितली आहे.
त्याचबरोबर भूखंडांवर विकास आराखड्यात आरक्षण आहे का, असल्यास त्याचा प्रकार आणि क्रमांक काय, तसेच आरक्षण नसल्यास ते का ठेवण्यात आले नाही, असे प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारले आहेत.
दरम्यान, भूखंड मोकळे असल्यास ते सिडकोकडून महापालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आधुनिक मनोरुग्णालय सुरू करावे, असा ठराव महासभेत मांडण्याची इच्छा पाटकर यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी महापालिका सचिवांकडे ठराव सादर केला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणात आता ‘मनोरुग्णालय’च्या प्रस्तावामुळे काय नवा रंग चढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
