नवी मुंबई : शहरातील रेल्वेस्थानकांशेजारी महाराष्ट्र राज्य वगळता देशातील विविध राज्यांची देखणी भवन साकारण्यात आली आहेत. मात्र अद्याप महाराष्ट्राचेच भवन अस्तित्वात आलेले नाही. देशातील विविध राज्यांची भवने वाशी रेल्वेस्थानकानजीक दिमाखात उभी असताना महाराष्ट्र भवनाचे काम मात्र १५ वर्षांपासून कागदावरच आहे. अखेर या कामाला सुरुवात झाल्याने लवकरच महाराष्ट्र भवनचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
मागील अनेक वर्षापासून शहरात खेडेगावाहून आलेल्या नागरिकांना राहण्यासाठी नवी मुंबईत हक्काचे ठिकाण नव्हते. त्यामुळे राज्याच्या कामाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांना पोलीस भरतीवेळी मुंबई विद्यापीठ, मरोळ पोलीस कॅम्प येथे पदपथावर राहावे लागते. त्यामुळे सर्वसामान्यांकडून राज्यकर्त्यांबाबत व प्रशासनाबाबत रोष होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विविध घटकांनी महाराष्ट्र भवनाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केला होता. यासाठी सिडकोने या कामाला गती देत वाशी सेक्टर ३० ए येथील सुमारे ८ हजार चौरस मीटर भूखंडावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. १२१ कोटी रुपये खर्चातून महाराष्ट्र भवन साकारले जाणार आहे. त्यामुळे निर्मित्तीसाठी विविध स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून आता भवनाचे काम कधी व कसे होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
असे असेल महाराष्ट्र भवन
महाराष्ट्र भवनची वास्तू १२ मजल्यांची असणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदींचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शयनगृहाच्या ११ खोल्या, ७२ डबल बेडच्या खोल्या अतिथीगृह आणि इतर एकूण १६१ खोल्या असणार आहेत. सभागृहामध्ये खोल्यांसह इतर सुविधांचा समावेश केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रशस्त पार्किंग व्यवस्था. सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल, रेस्टॉरंट आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. विविध कामांनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांसह, लोकप्रतिनिधी, परीक्षार्थी विद्यार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र भवनची वास्तू आगामी काळात उपयुक्त ठरणार आहे.
– आमदार मंदा म्हात्रे यांनीही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भवनसाठी पाठपुरावा केला होता.. २०२२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारने महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली होती.
– तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महाराष्ट्र भवन इमारतीच्या आराखड्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील विधिमंडळाच्या दालनात सादरीकरण केले होते.
– आता प्रत्यक्षात या वास्तूच्या कामाला सुरवात झाली आहे. सिडकोच्या माध्यमातून महाराष्ट्र भवनाच्या कामाला सुरुवात झाली असून वेगात काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.आहे.
२०१४ पासून सातत्याने बारा वर्ष महाराष्ट्र भवनासाठी प्रयत्न करत होते त्याला यश आले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र भवन निर्मितीचे काम वेगात सुरू आहे .हा महत्वपूर्ण प्रकल्प होत असून अभिमान वाटावा अशी देखणी वास्तू निर्माण होणार आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर
नवी मुंबई येथील वाशी येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड अनेक वर्ष फक्त आरक्षित होता. भूखंडावर महाराष्ट्र भवन असा फलकही मनसेतर्फे लावण्यात आला होता. आता या ठिकाणी महाराष्ट्र भवन होत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.- गजानन काळे, शहराध्यक्ष ,मनसे नवी मुंबई</p>
