नवी मुंबई: लोकल फलाटावर थांबण्यापूर्वीच अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून घाईने फलाटावर उतरतात. असाच प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा तोल जाऊन तो पडला. मात्र त्याने लोकलचा दरवाजा न सोडल्याने फलाट आणि लोकलच्या फटीत अडकून त्याचा जीव जाण्याची भीती होती. अशातच ही घटना पाहणाऱ्या वाशी रेल्वे पोलिसांनी पळत जाऊन त्या प्रवाशांचे प्राण वाचवले. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

रविवारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जन निमित्त गोवंडी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, महिला पोलीस हवालदार निमगिरी , मंजुश्री देव हे गस्त घालत होते. रात्री सात वाजून ३२ मिनिटांनी छ. शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावर धावणारी लोकलने गोवंडी स्थानकात प्रवेश केला. लोकल फलाट वर थांबण्यापूर्वीच एक पस्तिशीच्या व्यक्तीने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अंदाजा न आल्याने घसरून पडला. त्याने लोकलच्या दरवाज्या खालील भागाला पकडले होते. मात्र याच मुळे लोकल आणि फलाट या दरम्यानच्या अरुंद जागेत तो पडू शकत होता. ही घटना पाहताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे, महिला पोलीस हवालदार निमगिरी आणि देव यांनी धावत जाऊन त्याला पकडले व लोकल पासून खेचून फलाटावर सुरक्षित आणले. 

हेही वाचा : पनवेल: खारघरच्या मेडिकवर रुग्णालयात केमोथेरपी घेणाऱ्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळणार

प्रवाशाला दुखापत झाली असेल म्हणून त्याची विचारणा केली, मात्र मला काही झाले नाही सांगत तो निघून गेला. त्यामुळे सदर प्रवाशाचे नाव किंवा अन्य वैयक्तिक माहिती मिळू शकली नाही. अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.