नवी मुंबई : अद्याप पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले आहेत.

विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपड्या शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले.

हेही वाचा – करंजाडे ते पनवेल स्थानक बसच्या मार्गातील वाहतूक कोंडी दूर करा

यावर्षी पूर्वापार पद्धतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करण्याबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पावसाळी कालावधीत उद्भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करून ठेवण्याबाबत आरोग्य विभागास निर्देशित करण्यात आले. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसी’च्या सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला

पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवाऱ्याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करण्याबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

१५ जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणत: ६ हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजिटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त् सुनिल पवार व शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते.