नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला शहरातील काही भागांत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. घणसोली, कोपरखैरणे आणि तुर्भे विभागातील काही यादी भागांत नागरिकांकडून गणनापत्रिका भरून देण्याचे प्रमाण कमी असून, अनेक नागरिक घरी उपलब्ध नसल्याने त्यांची गणनापत्रिका अद्याप संकलित झालेली नाही. त्यामुळे या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) मदत घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) झालेल्या महासभेत केले.

एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत असून, ही शेवटची मुदतवाढ असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांची नावे अद्याप मतदार यादीत नाहीत किंवा मतदार यादीतील नोंदींमध्ये बदल करायचे आहेत, त्यांनी या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत नाव नोंदवले गेले नाही तर त्यानंतर नव्याने नोंदणीसाठी ‘फॉर्म ६’ भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, याच अद्ययावत मतदार याद्यांचा उपयोग आगामी महापालिका निवडणुकीसाठी केला जाणार असल्याने पात्र मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

महापालिका क्षेत्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) घरोघरी जाऊन गणनापत्रिकांचे वाटप आणि संकलन करण्यात येत आहे. मात्र, नागरिक घरी उपलब्ध नसणे किंवा गणनापत्रिका भरून देण्यास विलंब करणे यामुळे ‘अनकलेक्टेड’ गणनापत्रिकांची संख्या काही भागांत मोठी असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांनी आपल्या बीएलएंना बीएलओंसोबत जोडून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. बीएलओंना प्रत्येक मतदाराच्या घरी पोहोचणे शक्य होत नसताना स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्त्यांच्या मदतीने संपर्क साधणे अधिक सुलभ होऊ शकते, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

कमी प्रतिसाद असलेल्या भागांमध्ये घणसोलीतील यादी भाग क्रमांक १७९ ते २६५, कोपरखैरणेतील २८६ ते ३६१ आणि तुर्भेतील ४२९ ते ४४७ या भागांचा समावेश असल्याचे आयुक्तांनी महासभेत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी विशेष दक्षता घेऊन गणनापत्रिका जमा करण्याची गरज आहे. मतदार यादीत आधीपासून नाव आहे किंवा मतदार ओळखपत्र आहे, त्यामुळे एसआयआरची प्रक्रिया करण्याची गरज नाही, असा गैरसमज नागरिकांनी करून घेऊ नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेने शनिवार आणि रविवारी विशेष शिबिरे आयोजित केली होती. आता १५ आणि १६ ऑगस्ट रोजीही विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना गणनापत्रिका भरणे, आवश्यक माहिती देणे आणि प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीएलओ वेळेत उपलब्ध राहावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील असून, काही ठिकाणी शाळांमधून बीएलओंना वेळेत कार्यमुक्त केले जात नसल्याची अडचणही महासभेत मांडण्यात आली.

एसआयआरची प्रक्रिया केवळ मतदार यादी अद्ययावत करण्यापुरती मर्यादित नसून, त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याची प्रक्रियाही केली जाणार आहे. साधारणपणे ८०० ते ८५० मतदारांमागे एक मतदान केंद्र असावे, या निकषानुसार मतदान केंद्रांचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आगामी प्रभागरचना प्रक्रियेसाठीही अद्ययावत मतदारांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

त्यामुळे १७ ऑगस्टची अंतिम मुदत संपण्यापूर्वी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास गणनापत्रिकेची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांनीही आपल्या बीएलएंच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.