नवी मुंबई : महापालिकेने गोकुळष्टमीपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी वास्तवात पाणीकपातीची टांगती तलावर कायम राहणार आहे. कारण मोरबे धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत उपयुक्त जलसाठा कमी आहे. येत्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी न लावल्यास हा साठा कमी होऊन पुन्हा कपात लागू करण्याची वेळ महापालिकेवर येईल.

मोरबे धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सध्या मोरबे धरणातील जलसाठा कमी आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मोरबे धरणक्षेत्रात ३१४३.६० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण भरण्यासाठी अजूनही जवळजवळ ९०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे यंदाही या महिन्यात धरण भरावे अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. सध्या मोरबे धरणात ९२.९८ टक्के जलसाठा झाला असला तरी वापरायोग्य साठा केवळ ७६.९५ टक्केच आहे. त्याच्या तुलनेत गेल्यावर्षी धरणात ८४.३७ टक्के वापरायोग्य जलसाठा शिल्लक होता. महापौर सुजाता पाटील यांनी गोकुळाष्टमीपासून पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तर पालिका आयुक्तांन डाॅ. कैलास शिंदे यांनी पुढील काही दिवसांत अधिक चांगला पाऊस पडेल, अशी आशा ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

स्वत:च्या मालकीचे धरण असल्याने नवी मुंबईला जलसंपन्न शहर संबोधले जाते. परंतू यंदा मोठ्याप्रमाणात उन्हाचा चटका त्यातच अलनिनो संकटाची धास्ती सर्वानाच होती. त्यामुळे पालिकेनेही योग्य खबरदारी घेत पाणीकपात लागू केली. सध्या धरणात सामाधानकारक जलसाठा असल्याने महापौरांनी नागरिकांना दिलासा देत पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणातील साठा कमी आहे. अद्याप धरण १०० टक्के भरलेले नाही. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे धरण १०० टक्के कधी भरेल, याबाबत शंका आहे. पाणीकपात रद्द केल्यानंतर पाणीउपसा वाढून धरणातील जलसाठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रतिमाणसी निकषाप्रमाणे उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

मोरबे धरणातील उपयुक्त जलसाठा (२८ ऑगस्ट)
२०२४ २०२५ २०२६

८३.७२ टक्के ८४.३७ टक्के ७६.९५ टक्के

गोकुळअष्टमीपासून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.- सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई महापालिका

पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी आशा आहे की पुढील काही दिवसांत चांगला पाऊस पडेल. जेणेकरून शहराला सुयोग्य पाणीपुरवठा करता येईल.-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

पालिका प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.-मनोज हळदणकर, गटनेता, शिवसेना</strong>

मोरबे धरण परिसरात झालेला पाऊस
१९ ऑगस्ट- ८.२ मिमी

२० ऑगस्ट- ८.२ मिमी.

२१ ऑगस्ट- १२.४० मिम.
२२ ऑगस्ट- ३६.मिमी.

२३ ऑगस्ट- ८ मिमी.
२४ ऑगस्ट- ६.६ मिमी.

२५ ऑगस्ट- २.४ मिमी
२६ ऑगस्ट
२७ ऑगस्ट
२८ ऑगस्ट – २५.२० मिमी