नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या धरणात सुमारे ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, त्यापैकी २६ टक्के साठा राखीव आहे. मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने महापालिका प्रशासनाने परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वापराच्या दरानुसार उपलब्ध पाणीसाठी ८ ऑगस्टपर्यंतच पुरेल इतकाच आहे. या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन पाणी कपात लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या कोणतीही कपात लागू करण्यात आलेली नसली, तरी परिस्थितीचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला प्रामुख्याने मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर काही प्रमाणात बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होते. मात्र, सध्याच्या घडीला मोरबे धरणातील साठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्याने त्यातील घट चिंताजनक ठरत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापर वाढत असून, त्याचा थेट परिणाम साठ्यावर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
दरम्यान, अलीकडे झालेल्या महापालिकेच्या महासभेतही आयुक्तांनी पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरणातील साठा मर्यादित असल्याचे स्पष्ट करत, सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाणी सुमारे १०३ दिवसच पुरेल, असे सांगितले होते. संभाव्य कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम पुढील वर्षाच्या पाणी नियोजनावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे, वाहन धुण्यासाठी नळाचे पाणी वापरणे टाळणे, तसेच पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करता येऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या पाणी कपातीबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी पर्जन्यमान, उपलब्ध साठा आणि वाढता वापर यांचा एकत्रित आढावा घेऊन पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘एल निनो’च्या परिणामामुळे पर्जन्यमान घसरण्याची शक्यता
सन २००७ ते २०२५ या कालावधीत मोरबे धरण परिसरात सरासरी ३६०० ते ३६१७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारण ३५०० ते ३६०० मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र, एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यंदा अंदाजे ३३०० मिमी इतकाच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठा नियोजन अधिक कठोरपणे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मोरबे धरणातील पाणीसाठा ८ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच उपलब्ध आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठ्याबद्दलचा आढावा घेण्यात येणार असून, पाणीकपात लागू करायची की नाही याबद्दलचा निर्णय १५ मेपर्यंत घेण्यात येईल. -अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग
