नवी मुंबई : मोरबे मुख्य जलवाहिनीवरील विविध कामांसाठी नवी मुंबईतील पाणीपुरवठा मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी १६ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अनेक विभागांसह सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १० ते बुधवारी पहाटे २ या कालावधीत ही कामे केली जाणार आहेत. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पंपचा चॅनेल विलग करण्यासाठी एम.एस. प्लेट बसविणे, नवीन मीटरिंग किऑस्क बसविणे तसेच मोरबे मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळील २,०५० मि.मी. व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसविण्यात येणार आहे. याशिवाय सीबीडी सेक्टर-७ येथे १,८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.वाशीतील अरेंजा सर्कलजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर ७०० मि.मी. व्यासाचा, तर महापे येथे ९०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. या कामांमुळे मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या बंदचा परिणाम बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागांवर होणार आहे. तसेच सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा पूर्ववत केल्यानंतर जलवाहिनीतील प्रवाह सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी सकाळचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ शकतो. नागरिकांनी पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी केले आहे.
