नवी मुंबई : मोरबे धरणातून नवी मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी (३ नोव्हेंबर) नवी मुंबईतील बहुतांश भागांत पाणी येणार नाही. सकाळी १० ते रात्री ८ या दहा तासांच्या कालावधीत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सात विभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्याबरोबरच सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेने दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिन्यांवर विविध क्षमतेच्या झडपा बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याचे अचूक मोजमाप आणि वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी शिरवणे येथे चार प्रवाहमापक (फ्लोमीटर) बसविण्यात येणार आहेत. या कामांसाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक असल्याने मंगळवारी संपूर्ण दिवसभराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

सानपाडा, वाशी आणि बेलापूर परिसरात सर्वाधिक कामे प्रस्तावित आहेत. सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर ४०० मिमी व्यासाची बटरफ्लाय झडप बसविण्यात येणार आहे. तसेच सानपाडा सेक्टर ३० मधील सामना प्रेसजवळ २५० मिमी व्यासाची स्लुईस झडप बसविण्यात येईल. वाशी सेक्टर १९ मधील सतरा प्लाझा परिसरातही २५० मिमी व्यासाची स्लुईस झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

वाशी सेक्टर २९ येथे ७०० मिमी व्यासाची बटरफ्लाय झडप बसविण्यात येणार असून, बेलापूर सेक्टर २८ येथील पंपगृहात पंपांना जोडणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या इनलेटवरही नवीन बटरफ्लाय झडप बसविण्यात येणार आहे. बेलापूर सेक्टर १५ मधील किल्ला जंक्शन येथे मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर ९०० मिमी व्यासाची मोठी बटरफ्लाय झडप बसविण्यात येणार आहे. याशिवाय शिरवणे गावाजवळील ८०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर चार फ्लोमीटर बसविण्यात येतील.

दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणी

मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवावा लागणार आहे. विशेष म्हणजे, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा लगेच पूर्ववत होण्याची शक्यता नसून, बुधवार (४ नोव्हेंबर) सकाळी नवी मुंबईतील संबंधित भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना बुधवारीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मंगळवारी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.