नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा जुलै २०२७ अखेरपर्यंत पुरविण्यासाठी दररोज ८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वाचविण्याचे उद्दिष्ट नवी मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र त्यासाठीच्या नियोजनात गोंधळ दिसून येत आहे. शहरात गढूळ पाणी येण्याच्या तक्रारी वाढत आहेत, तर दुसरीकडे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. सर्वांना समान पाणी देण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची हीच अंमलबजावणी आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्देशांनंतरही नवी मुंबई महापालिका प्रशासनाने थेट कपात लागू करण्याचे टाळून केवळ नियोजनाचा पर्याय निवडला. यामागे सत्ताधाऱ्यांची नाराजी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे का, अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष महासभेत पाणीपुरवठ्याचा आराखडा मांडताना प्रतिमाणशी १५० लिटरचा निकष लागू करण्याचे आणि दररोजचा उपसा ४०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार, प्रत्यक्ष पुरवठ्यात किती घट झाली आणि बचतीचे उद्दिष्ट कोणत्या कालमर्यादेत गाठले जाणार, याबाबत घोषणेनंतर आठवडा उलटला तरी अद्याप स्पष्टता आलेली नाही. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आराखड्यावर काम सुरू असून लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांवर पाणी जपून वापरण्याची जबाबदारी टाकायची आणि प्रशासनाने मात्र कागदावर आराखडे आखायचे असे चित्र सध्या दिसत आहे.
पाणी नियोजनाच्या नावाखाली नागरिकांवर अघोषित कपातीचा भार टाकायचा आणि राजकीय पातळीवर अप्रिय ठरू शकणारा निर्णय टाळायचा, असा प्रकार सुरू असल्यास त्याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पाणीसाठा जपण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे; त्यामुळे सत्ताधाऱ्यांची नाराजी टाळण्यापेक्षा शहराच्या पाणीपुरवठ्याचे वास्तव आणि नागरिकांच्या गरजा यांना प्राधान्य देणार का, हा प्रश्न आता महापालिकेला टाळता येणार नाही.
८० एमएलडी बचत कुठे?
मोरबे धरणात १६ ऑक्टोबर रोजी १६३.९० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८५.८६ टक्के जलसाठा होता. मृत साठा आणि बाष्पीभवनातील संभाव्य वाढ विचारात घेतल्यानंतर शहरासाठी सुमारे १२० दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यायोग्य असल्याची माहिती महासभेत देण्यात आली होती. सध्याच्या उपशाने हा साठा उन्हाळ्यापर्यंतच पुरण्याची शक्यता लक्षात घेऊन उपसा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष उपसा किती कमी झाला, याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाही. पाणी बचतीचा आराखडा मांडल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्याबाबत मौन का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गळती कोण रोखणार?
पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि इनलाइन मोटारी रोखण्यासाठी आठ उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथके नियुक्त करण्यात आल्याची घोषणा आयुक्तांनी केली. मात्र, किती ठिकाणी तपासणी झाली, किती जोडण्या आढळल्या आणि किती कारवाया करण्यात आल्या, याचा तपशील समोर आलेला नाही. महापालिकेच्या पाहणीनुसार, जलवाहिन्या, झडपा आणि दाबातील तांत्रिक कारणांमुळे वितरणादरम्यान १५ ते १८ टक्के पाण्याचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. एवढे पाणी वाया जाण्याची शक्यता असताना प्रशासनाने गळती रोखण्यासाठी केलेल्या कामाचा हिशेब देणे आवश्यक आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यापूर्वी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडायला हवी.
समान वाटपाच्या दाव्यांचे काय?
ऐरोली सेक्टर ५ मधील काही सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्यात किडे आणि आळ्या आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. महापालिकेने २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पाण्याचे नमुने तपासल्याचे सांगितले असले, तरी संबंधित सोसायट्यांतील तक्रारींचे निराकरण झाले का आणि तपासणीचा अहवाल काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. घणसोलीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींवरही नागरिकांना ठोस तांत्रिक उत्तर मिळालेले नाही. अशा परिस्थितीत पाणीवापर मर्यादित करण्याच्या नियोजनाची अंमलबजावणी कशी होणार, याचे उत्तर प्रशासनाने द्यायला हवे.
सत्ताधाऱ्यांपुढे नमते घेतल्याची चर्चा
राज्य शासनाचे १० टक्के पाणीकपातीचे स्पष्ट निर्देश असतानाही नवी मुंबईत स्वतंत्र कपात लागू करण्यात आलेली नाही. कपात लागू केल्यास नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी राजकीय नेतृत्वाचा रोष टाळण्यासाठी प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे प्रशासनाने नमते घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. मात्र, पाणीकपात न करण्यामागील कारणे आणि नियोजनाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती प्रशासनाने स्पष्ट न केल्यास या चर्चांना अधिक बळ मिळणार आहे.
