नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एम.बी.आर.मध्ये नवीन जलवाहिनी जोडणी तसेच मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसविणे आणि देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असून, यासाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा १८ तासांसाठी बंद राहणार आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.०० वाजेपर्यंत एकूण १८ तासांसाठी शहरातील मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एम.बी.आर.मध्ये नवीन जलवाहिनी जोडणीचे काम, तसेच मुख्य जलवाहिनीवर आवश्यक व्हॉल्व्ह बसविणे आणि इतर देखभाल दुरुस्तीची कामे केली जातील.
या नियोजित कामामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात पाणी येणार नाही. तसेच, नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांवरही याचा परिणाम होईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीव्यतिरिक्त सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणीपुरवठा देखील पूर्णपणे बंद राहणार आहे.
मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने शहरात संध्याकाळचा पाणीपुरवठाही होणार नाही. याव्यतिरिक्त, बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळी कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने वर्तवली आहे.
त्यामुळे या कालावधीमध्ये पाण्याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेच्या या अत्यावश्यक कामांसाठी सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका हद्दीतील सर्व नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
