नवी मुंबई : शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होत असताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शनिवारी मोरबे धरण आणि शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धरणातील पाणी प्राशन करून त्यांनी त्याच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर मोरबे धरणातील पाणी शुद्ध, सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने पुनःश्च केला आहे.

गेल्या काही दिवसांत शहरातील काही भागांत गढूळ व मातीमिश्रित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी मोरबे धरण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, पाणी वितरण यंत्रणा तसेच बेलापूर येथील नियंत्रण केंद्राची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. उपमहापौर दशरथ भगत, पाणीपुरवठा व मलनिःस्सारण समितीचे सभापती रविकांत पाटील, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता तथा पाणीपुरवठा विभाग प्रमुख अरविंद शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना महापौरांनी सांगितले की, मोरबे धरणाची एकूण क्षमता ८८ मीटर असून सध्या जलस्तर ७२ मीटरवर आहे. त्यापैकी सुमारे १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो जुलैपर्यंत शहराच्या गरजा भागविण्यास पुरेसा असल्याची माहिती महापौरांनी दिली.

प्रत्यक्ष पाणी प्राशन करून व्यक्त केला विश्वास

गढूळ पाण्याच्या तक्रारींबाबत बोलताना महापौरांनी धरणातील पाणी प्रत्यक्ष प्राशन केले. पाण्याला कोणताही वास नाही, रंगामध्ये बदल नाही आणि चवीतही कोणताही फरक जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. मोरबे धरणातील पाणी विविध टप्प्यांवरील शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

गढूळ पाणीपुरवठ्याचे कारण स्पष्ट करताना प्रशासनाने काही दिवसांपूर्वी झालेल्या तांत्रिक शटडाऊनचा उल्लेख करत गढूळ पाणी येण्या मागचे कारण समजावून सांगितले. पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल कामांनंतर पाइपलाइनमध्ये साचलेला गाळ आणि माती प्रवाहासोबत पुढे गेल्याने काही भागांत तात्पुरत्या स्वरूपात गढूळ पाणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही समस्या बहुतांश प्रमाणात दूर झाल्याचा दावा प्रशासनाने केला. तसेच अद्यापही काही भागात समस्या असल्यास प्रशासनाला कळवावे, एका तासाच्या आत तपासणी करून समस्या सोडवण्यात येईल असा दावाही प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, महापौरांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. हवामान खात्याने मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोसायट्यांनी आपल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात

शटडाऊननंतरही काही भागांत गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. मात्र, पाणी सर्व निकषांवर तपासल्यानंतरच ते पिण्यास योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नसल्यानेही पाणी गढूळ दिसू शकते, असे महापौरांनी नमूद केले. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी आणि तक्रारी असल्यास महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.