नवी मुंबई : पामबीच येथे एका युवकाने मैत्रिणीची गळा दाबून हत्या करून स्वत: खाडीत उडी घेतल्याची घटना बुधवारी घडली होती. मात्र या घटनेतील आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह अद्याप सापडला नसून पोलिसांचे शोधकार्य सुरूच आहे.

आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव स्वस्तिक पाटील असे आहे. पामबीच मार्गावर एनआरआय कॉम्प्लेक्सनजीक असणाऱ्या जेट्टी परिसरात बुधवारी संध्याकाळी ४.३० ते पाच वाजण्याच्या सुमारास या तरुण-तरुणींमध्ये वाद सुरू होते. मात्र काही वेळाने स्वस्तिकने जेट्टीवरून खाडीत उडी मारली. हे काही मच्छीमारांनी पाहिले व त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओहोटीची वेळ असल्याने पाणी खाडीत ओढले जात असल्याने तो मच्छीमारांच्या हाती लागला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…निवडणूक आचारसंहितेपूर्वी नैनातील चार हजार कोटींच्या रस्ते कामांच्या भूमिपूजनासाठी सिडकोच्या हालचालींना वेग

स्वस्तिकला शोधण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमारांची मदत घेतली गेली. मात्र त्यात अंधार आणि अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे शोधकार्य रात्री थांबवले गेले ते गुरुवारी पहाटेपासून पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत मृतदेह आढळून आला नाही.

याशिवाय दोघांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झालेले नाही. दोघांची काही पार्श्वभूमी समोर आली आहे. मात्र घटनेवेळी नेमके काय घडले याचा शोध घेतला जात आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा…पनवेलच्या ग्रामीण भागात बेकायदा बांधकाम करणाऱ्या ग्रामस्थावर महापालिकेची फौजदारी कारवाई

समाजमाध्यमातून ओळख

या तरुण-तरुणीची समाज माध्यमाद्वारे ओळख झाल्यावर काही दिवसांनी ते एकमेकांना भेटले, त्यातून मैत्री झाली. काही वर्षे ती मैत्री टिकली. मात्र मे महिन्यात त्यांच्यात काही तरी वाद झाले आणि मैत्रीत अंतर आले. नेहमीप्रमाणे भेट होत नव्हती. मात्र घटनेच्या दिवशी दोघे भेटले व त्यांच्यात पुन्हा वाद झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही प्राथमिक माहिती असून प्रकरणाचा पूर्ण उलगडा झालेला नाही. दोघांत नेमके कशावरून वाद झाले, कोणी कोणाला बोलावले इत्यादी तापास बाकी आहे.