नवी मुंबई : अवघ्या दहा ते पंधरा फुटांवर बोगद्याची कमान डोळ्यांसमोर कोसळली… क्षणभर काय करावे हे न सुचलेल्या नवी मुंबईतील तीन तरुणांनी मात्र प्रसंगावधान राखले. मिसिंग लिंकमधील इमर्जन्सी बटण दाबून कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली, तसेच मागून येणारी वाहने थांबवली. त्यामुळे सोमवारी पहाटे झालेल्या दरड दुर्घटनेनंतर आणखी मोठी दुर्घटना टळली.
नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-१० येथील रहिवासी संदेश खरात (२४), अक्षय लांडगे (३२) आणि रोशन सरगर (२२) हे सोमवारी पहाटे कुटुंबीयांसह कारने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटे सुमारे तीनच्या सुमारास त्यांची कार मिसिंग लिंक बोगद्याजवळ पोहोचली. त्यावेळी बोगद्याच्या परिसरात वरून पाणी झिरपत होते, तर लहान दगडही सतत कोसळत होते. परिस्थिती काहीशी असामान्य वाटल्याने त्यांनी वाहन थांबवून काही वेळ निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला.
पुढे नेमके काय घडले आहे, हे पाहण्यासाठी संदेश, अक्षय आणि रोशन हे तिघेही वाहनातून खाली उतरले. ते बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावर असतानाच अचानक मोठा दगड कोसळला. त्यानंतर काही क्षणांतच प्रवेशद्वारावरील कमान कोसळून माती, दगड आणि पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर पसरला. क्षणार्धात संपूर्ण मार्ग बंद झाला. ही घटना डोळ्यांसमोर घडल्याने तिघेही काही क्षण हादरून गेले.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखत त्यांनी तातडीने घटनास्थळी बसविण्यात आलेले इमर्जन्सी बटण दाबून कंट्रोल रूमला माहिती दिली. त्याचबरोबर मागून येणाऱ्या वाहनांना हातवारे करून थांबवले आणि पुढे न जाण्याचा इशारा दिला. काही वेळातच वाहतूक वळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
घटनेच्या वेळी समोरच्या बाजूला एखादे वाहन अडकले असेल का, अशी भीतीही त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी काही अंतर चालत जाऊन परिस्थितीचा अंदाज घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र वरून सातत्याने दगड कोसळत असल्याने अधिक वेळ थांबणे धोकादायक असल्याचे लक्षात येताच ते मागे फिरले. त्या क्षणी बोगद्याचाही काही भाग कोसळू शकतो, अशी भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर मिसिंग लिंकमधून पुन्हा प्रवास करताना मनात भीती निर्माण झाल्याची भावना तिघांनी व्यक्त केली. अशा संवेदनशील बोगद्यांमध्ये केवळ इमर्जन्सी बटण पुरेसे नसून प्रत्येक एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचारी तैनात असावेत. त्यामुळे अशा प्रसंगी तातडीने मदत मिळू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरड कोसळल्यानंतर मार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली असली, तरी या तीन तरुणांनी अनुभवलेले ते काही क्षण मिसिंग लिंकमधील आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून गेले आहेत.
