पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सर्वाधिक ३५८ मिमी पावसाची नोंद नवीन पनवेल येथे झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील सरासरी पर्जन्यमान २१३.२० मिमी इतके नोंदविण्यात आले. जोरदार पावसामुळे शहरात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू तर एका व्यक्तीला दुखापत झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये नवीन पनवेल येथे सर्वाधिक ३५८ मिमी पावसाची नोंद झाली. पनवेल शहरात २२५ मिमी, खारघर येथे १३४.४ मिमी आणि कळंबोली येथे १३४.४ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत महापालिका क्षेत्रातील सरासरी पर्जन्यमान २१३.२० मिमी इतके होते. नवीन पनवेल येथील बांठीया शाळेसमोरील रस्त्यावर पाणी साचले होते. नवीन पनवेल येथील समाजमंदीरामध्ये आरोग्य केंद्रात जाण्यासाठी पाय भिजवून जावे लागत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काही तासानंतर पाणी ओसरले.
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नोंदीनुसार, २९ ठिकाणी झाडे कोसळली, तर ५७ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तसेच तीन ठिकाणी इमारतींच्या स्लॅब अथवा बाल्कनीचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी बचावकार्य (रेस्क्यू) करण्यात आले.
पनवेल – पनवेल महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सर्वाधिक ३५८ मिमी पावसाची नोंद नवीन पनवेल येथे झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील सरासरी पर्जन्यमान २१३.२० मिमी इतके नोंदविण्यात आले. जोरदार पावसामुळे शहरात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये… pic.twitter.com/dxDATmS3Eg
— LoksattaLive (@LoksattaLive) July 6, 2026
या कालावधीत आगीची एकही घटना घडली नाही. तसेच भूस्खलनाची कोणतीही घटना नोंदविण्यात आलेली नाही. मात्र पावसाशी संबंधित घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एका व्यक्तीला दुखापत झाली आहे.
दुपारी ३.५६ वाजता ४.०८ मीटर उंचीची, तर पहाटे ४.३८ वाजता ३.४४ मीटर उंचीची भरती अपेक्षित असल्याने नागरिकांनी समुद्रकिनारे, खाड्या व नद्यांच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पनवेल महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०२२-२७४५८४०/४१ किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२२७७०१ वर संपर्क साधावा, असेही उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगितले.
