नवी मुंबई शहरात नवरात्र उत्सव आनंदाने साजरा केल्यानंतर आज देवींचा विसर्जन सोळा पार पडला. विसर्जन सोहळ्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली होती. शहरातील विसर्जन तलावावर नाचत गाजत मिरवणुका काढत विसर्जन करण्यात आले. करोनामुळे गेली दोन वर्ष नवरात्र उत्सवही साध्या पध्दतीने व निर्बंधामध्ये केला जात होता.परंतू करोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला.नवी मुंबई शहरात ३३८ ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज दसऱ्याच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने देवींना निरोप देण्यात आला. देवींच्या विसर्जन सोहळ्याला सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात झाली होती. विसर्जन मिरवणुकीत तल्लीन होऊन भक्त नाचताना पाहायला मिळाले.

हेही वाचा >>>नवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला पसंती

पालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. नवी मुंबई महपालिकेकडून हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी नैसर्गिक तलावावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पालिकेने २२ मुख्य विसर्जन स्थळांवर सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न व्हावे याकरिता तराफ्यांची तसेच मोठ्या मुर्तींकरिता ट्रॉली व क्रेनची व्यवस्था केली आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळांच्या काठांवर आवश्यक त्या ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आलेले होते. प्रत्येक ठिकाणी पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती. दसऱ्याच्या दिवशी दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट होण्यासाठी रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाप्रमाणेच यावेळी नवरात्र उत्सवात व विसर्जन सोहळ्यात नागरीकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

नवी मुंबई शहरात २२ विसर्जन तलावावर पालिकेने विसर्जन व्यवस्था केली होती. शांततेत विसर्जन सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस व्यवस्थाही सज्ज होती. – दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ १