काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीची सरशी; शिवसेनेच्या मनसुब्यांना सुरुंग
गतवर्षीप्रमाणे यंदाही काँग्रेसच्या सदस्य मीरा पाटील आपल्याला मतदान करतील आणि समान मतांमुळे पीठासीन अधिकारी चिठ्ठय़ा टाकतील. त्यात आपल्याच मतदाराची चिठ्ठी निघेल आणि स्थायी समितीचे सभापतिपद शिवसेनेला मिळेल, असे आडाखे बांधणाऱ्या शिवसेनेचे मनसुबे राष्ट्रवादीने उधळून लावले. मीरा पाटील यांचे मत राष्ट्रवादीच्या पारडय़ात पडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांनी ९ मते मिळवत शिवसेनेच्या ऋचा पाटील (७) यांचा पराभव केला. स्थायी समिती यंदाही शिवसेनेकडेच रहावी, यासाठी पक्षांतर्गत विरोध डावलून विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना स्थायी समितीत धाडण्यात आले होते.




तुर्भे येथील शहरी व ग्रामीण भागाचे नेतृत्व करणाऱ्या शुभांगी पाटील या नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील दुसऱ्या महिला सभापती ठरल्या. गतवर्षी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला पीठासीन अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्याने (ते काही तासापूर्वी स्थायी समिती सदस्य झाले होते. नियमानुसार स्थायी समिती सदस्याला तीन दिवस आधी निवडणुकीची सूचना देणे आवश्यक असते) आणि काँग्रेसच्या मीरा पाटील यांनी शिवसेनेच्या पारडय़ात मत टाकल्याने शिवसेनेचे शिवराम पाटील सभापती झाले होते. त्यामुळे यंदाही काँग्रेसच्या सदस्य आपल्यालाच मतदान करतील आणि राष्ट्रवादीचा एखाद दुसरा सदस्य खरेदी करता येईल, समसमान मतदान झाल्यास आपलेच नशीब उजळेल, अशी गणिते शिवसेनेत मांडण्यात आली होती.
मंगळवारी दुपारी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात राष्ट्रवादीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना नऊ मते मिळाली. त्यांच्या पक्षाचे आठ सदस्य व काँग्रेसच्या मीरा पाटील यांचे एक मत अशा नऊ मतांचा त्यात समावेश आहे. शिवसेना भाजपाला त्यांची सात मते प्राप्त झाली. त्यामुळे कोणत्याही पक्षाची मते फुटली नाहीत.
काँग्रेसच्या मीरा पाटील यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी तर राष्ट्रवादीला मतदान करणार नाही, असे जाहीर केले होते पण मीरा पाटील यांनी पक्षशिस्त पाळली आणि शुभांगी पाटील विजयी झाल्या. त्यांना पक्षश्रेष्ठींनी रुाष्ट्रवादीला मतदान करण्याचा व्हिप बजावला होता. त्यामुळे गेल्या वर्षी अपात्रतेची कारवाई झाली नसली तरी यंदा पक्षश्रेष्ठी शांत बसणार नाहीत, हे लक्षात घेऊन पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पाटील यांच्या विजयाने पालिकेत सत्ता असताना हातातून गेलेली तिजोरीची चावी पुन्हा राष्ट्रवादीच्या हातात आली आहे.
पराभवाच्या शक्यतेमुळे माघार
काँग्रेसच्या पाटील व राष्ट्रवादीचा एकही सदस्य गळाला लागत नाही, हे लक्षात येताच शिवसेनेच्या बोहल्यावर चढलेल्या सदस्यांनी सोमवारीच माघार घेतली होती. त्यामुळे पराजय लक्षात येताच ऋचा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.