ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नवी मुंबईतील पक्षाचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या पक्षांतरासंदर्भात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. महापौर बंगल्यावर सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त करत नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली. खुद्द नाईक कुटुंबाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी, मंगळवारी नाईक कुटुंबीय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक व त्यांचे पुत्र आमदार संदीप नाईक हे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याची चर्चा  सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापौर जयवंत सुतार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी सोमवारी म् आयोजित केलेल्या गटारीपूर्व स्नेहभोजनाची बैठक हे नाईक यांच्या भाजप प्रवेशाची वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठे निमित्त ठरले. बैठकीत सुरुवातीला महापौर जयवंत सुतार यांनी सद्य राजकीय स्थिती उपस्थितांसमोर मांडली. त्यानंतर चार तास चाललेल्या या बैठकीत काही नगरसेवकांनी आपली मते व्यक्त केली.  त्यानंतर भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे दर्शवण्यासाठी हात वर करून निर्णय घेण्यात आला. ‘नवी मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे. मात्र, विकासाभिमुख प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यात प्रशासकीय पातळीवर अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत आम्हा सर्वाच्या भावना नाईक यांच्या समोर मांडण्यात येतील,’ असे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  मंगळवारी सकाळी  हे भाजप प्रवेश इच्छुक नगरसेवक नाईक यांना भेटणार असून त्यांना भाजपसाठी गळ घालणार आहेत. पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे भासवून नाईक यांच्यावर दबाव असल्याचे भासवण्यात येत असले, तरी नाईक यांच्याकडूनच ही पक्षांतरपूर्व वातावरण निर्मितीची योजना आखण्यात आल्याची चर्चा आहे.