नारायण राणेनंतर आता नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हेदेखील भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. गणेश नाईक भाजपमध्ये आल्यास मी त्यांचे आरती ओवाळून स्वागत करेन, असे वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि विद्यमान काँग्रेस नेते नारायण राणे हेदेखील भाजपचे कमळ हातात धरणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता मंदा म्हात्रे यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबिय भाजपमध्ये आल्यास मला कोणताही आक्षेप नाही. मीच गणेश नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये मी सर्वात पुढे होते. मात्र, त्यांनी माझ्याशी दगाफटका केला. परंतु, आता नाईक व त्यांचे कुटुंबिय भाजपमध्ये येऊ इच्छित असतील तर माझा कोणताही आक्षेप नाही. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईत गणेश नाईक यांची निर्विवाद सत्ता आहे. त्यांच्या प्रभावामुळे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीने नवी मुंबई महानगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील नारायण राणे हे प्रत्येक पक्षाला हवे असणारे व्यक्मित्त्व असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यामुळे राणे कमळ हाती घेणार का, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘माझ्या पक्षांतराच्या बातम्या काँग्रेसचे नेत्यांकडूनच पेरल्या जात आहेत, असा आरोप मागील आठवडयातच राणे यांनी केला होता. त्यावेळी नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर प्रहार केला होता. यासोबतच कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही राणे यांनी सांगितले होते. मात्र ‘भूकंप सांगून येत नाही, तो अचानक होतो’, अशी सूचक प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली होती.
