नवी मुंबई : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने बुधवारी मुंबईच्या प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या वाशी येथे आंदोलन करत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. जीवनावश्यक वस्तू, घरगुती गॅस आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांचे अर्थकारण विस्कळीत होत असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास महाविकास आघाडीतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरसमोर झालेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य कुटुंबांना, नोकरदार वर्गाला आणि लघुउद्योजकांना बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महागाई नियंत्रणासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत निदर्शने करण्यात आली.
आंदोलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. शिंदे यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. मात्र, महागाई आणि शेतकरी प्रश्नांवर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंधन आणि गॅस दरवाढीमुळे आर्थिक ताण
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींवरून केंद्र सरकारवर टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या बदलांचा फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी इंधनावरील कर कमी करण्याची मागणी केली. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम लहान व्यावसायिकांवर होत असून घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी महागाईचा सर्वाधिक फटका शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना बसत असल्याचे सांगितले. वाढत्या खतांच्या किमतीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढणार असून त्याचा परिणाम कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
कर्जमाफी आणि विधान परिषद निवडणुकीचाही मुद्दा
आंदोलनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. जाहीर केलेल्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. केवळ घोषणांमुळे कृषी क्षेत्रातील समस्या सुटणार नाहीत, असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत वाढती महागाई, रोजगार आणि उद्योग क्षेत्रातील प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी केली. आगामी काळात या मुद्द्यांवर राज्यभर अधिक व्यापक आंदोलन उभारण्याचे संकेतही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिले.
