नवी मुंबई : रायगड जिल्हा हा भौगोलिक, नैसर्गिकदृष्टय़ा खूप संपन्न आहे. येथील समुद्रकिनारे, किल्ले रायगड, जंजिरा, अभयारण्य, प्राचीन लेणी, पाली-महाड यांसारखी तीर्थक्षेत्रे, माथेरानआणि विविध पर्यटनस्थळे यांचा सर्वागीण विकास करून येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक वेळ खिळवून ठेवता येईल. त्यामुळे रायगडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढेल, शिवाय त्याची व्याप्तीही वाढेल. यासाठी रायगडमधील पर्यटनस्थळांचा शोध घेऊन त्यांचा भौगोलिक विकास करून ‘टुरिस्ट हब’ बनविले तर पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

रायगड जिल्ह्यच्या प्रगतीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पर्यटन, पायाभूत विकास, वाहतूक आदी क्षेत्रांशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘अ‍ॅडव्हाण्टेज रायगड’ या संवादसत्राचे आयोजन केले होते. या संवादसत्राचे उद्घाटन ‘हिरानंदानी समुहा’चे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते झाले. तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी बोलताना हिरानंदानी यांनी रायगड जिल्ह्यमध्ये भविष्यातील महामुंबई होण्याच्या पुरेपूर क्षमता असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी होत असलेल्या वाहतूक, दळणवळण सुविधांचा आढावा घेतानाच या जिल्ह्यत उभ्या रहात असलेल्या पायाभूत प्रकल्पांबाबतही त्यांनी भाष्य केले. ‘अ‍ॅडव्हाण्टेज रायगड’च्या पर्यटन विषयावरील पहिल्या संवादसत्रात माजी राज्यमंत्री अदिती तटकरे आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी कोणकोणत्या उपाययोजना राबवून रायगड पर्यटन आणि पर्यटकांना आकर्षित करता येईल याबाबत संवाद साधला. 

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

यावेळी माजी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, मी राज्यमंत्री असताना रायगड पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच श्ॉक धोरण राबवून समुद्रकिनाऱ्यांचा क्षमतेनुसार विकास करण्याची योजना आखली होती.  बीचश्ॉक्स उभारून परिसरातील, किनाऱ्यावरील स्वच्छता व सौंदर्य राखून पर्यटकांना सुविधा आणि त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. श्रीवर्धन बीचचा उत्तम विकास झाला असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येत असतात.   रायगडमध्ये पर्यटनाला प्रचंड संधी आहे.  डॉ. सलीम अली पक्षी संशोधन केंद्र प्रस्तावित आहे. त्याचे जवळपास ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवेआगरमध्ये पर्यटन आणखीन वाढविण्यासाठी पर्यटक २ दिवस ऐवजी ४ दिवस राहिले पाहिजेत, या दृष्टीने नियोजन  केले पाहिजे.  दिवेआगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठिकाणी कासवांचे संवर्धन केले जाते.  या ठिकाणी कासवांची छोटी पिल्ले समुद्रात सोडण्याचा अनुभव घेता येतो. यासाठी दिवेआगरमध्ये कासव संवर्धन केंद्र आणि संग्रहालय उभारून वेगवेगळय़ा कासवांची प्रजाती, कासवांची छोटी पिल्ले सोडण्याचा अनुभव दिला तर पर्यटक थांबतील, असे त्यांनी सांगितले.

हल्ली कोणताही पर्याय उपलब्ध नसेल किंवा एक ते दोन दिवसांकरिता फिरायला जायचे असेल तर पर्यटक रायगड पर्याय निवडतात. याच पर्यटकांना पर्यटनस्थळी राहण्याच्या योग्य सोयीसुविधा दिल्या, त्याचबरोबर इतर पर्यटन सुविधा उपलब्ध करून प्रेक्षणीय स्थळांचा आनंद दिल्यास पर्यटक या ठिकाणी आणखीन दिवस राहण्याचा पर्याय निवडतील. यासाठी रायगडमध्ये ही फुकेत मॉडेल राबविल्यास पर्यटकांना आकर्षित करता येईल, असे मत कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी व्यक्त केले. फुकेतमध्ये ४० कि.मी. लांब आणि २० कि.मी. रुंद असा अर्धा अलिबाग किंवा श्रीवर्धन एवढा फुकेत आहे. फुकेतला स्वत:चे विमानतळ आहे. फुकेतमध्ये १२ समुद्रकिनारे आहेत. तिथल्या सरकारने २५-३० वर्षांपूर्वी नियोजन आखले. या ठिकाणची झाडे तोडली नाहीत. मात्र समुद्रकिनाऱ्यावरील २ हजार एकरवर सीआरझेडचा विचार न करता १२ पंचतारांकित शहरे निर्माण केली.  तेथे टायगर थीम पार्क, हनुमान पुतळा, डॉल्फिन शो, सर्कस इतर अ‍ॅक्टिव्हिटी सुरू असतात. याच धर्तीवर रायगड पर्यटन वाढविण्यासाठी व्हाइट वॉटर राफ्टिंग, हाऊस बोट, वायनरी टुरिझम करता येईल.  सरकारने आम्हाला कोणतीही मदत नाही केली तरी चालेल, परंतु पर्यटनासाठी आवश्यक परवानग्या तात्काळ द्याव्यात, एवढी मदत शासनाने केली तरी तीही पुरेशी होईल असे मत यादवराव यांनी या चर्चासत्रात व्यक्त केले. दरम्यान, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक करताना ‘अ‍ॅडव्हाण्टेज रायगड’ कार्यक्रमामागची भूमिका विशद केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. 

मुंबईशेजारीच नवी मुंबई विमानतळ होत असून आगामी काळात नवी मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व येणार असून  देशात रायगड महानगर सर्वाधिक रोजगार व उत्पन्न निर्मिती करणारे शहर ठरणार आहे. याच शहरात परवडणाऱ्या शहरांची निर्मिती करता येणे शक्य होणार आहे.

 – निरंजन हिरानंदानी, सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, हिरानंदानी ग्रुप

या कार्यक्रमामुळे सिडकोबद्दल असलेले पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली. भविष्यातील रायगड नेमका कसा असेल हे समजून घेणे शक्य झाले.  भूमिपुत्रांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘लोकसत्ता’ने असाच आणखी एक कार्यक्रम आयोजित करावा.

– योगेश मगर, सचिव, रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशन.

सर्वसामान्य जनतेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निर्णयांशी अवगत करून देणारा लोकसत्ताचा अ‍ॅडव्हाण्टेज रायगड हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. आपल्या आजुबाजूचे जग किती वेगाने बदलत जाणार आहे याची चुणूक यानिमित्ताने आली. लोकसत्ताचा हा उपक्रम अधिक लोकसापेक्ष आहे असे वाटते.

– सचिन पाटील, डॉक्टर.