नवी मुंबई : नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री तसेच गुटख्याची विक्री यांसह प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. पोलिसांच्या पुढाकाराने नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत बेघर आणि गर्दुल्ल्यांना स्थानक परिसरातून हटविण्यात आले. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूसह परिसरातील संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

नेरूळ सेक्टर २० येथील रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातील वृत्त २८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. स्थानक परिसरातच मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री, गुटख्याची विक्री तसेच प्रवाशांशी वादाचे प्रकार घडत असल्याने स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० ते २ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० या कालावधीत ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान स्थानक परिसरात आढळलेल्या बेघर आणि गर्दुल्ल्यांना तेथून हटविण्यात आले. संबंधित ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी प्रवाशांना त्रास होऊ नये तसेच स्थानक परिसराचा वापर गैरप्रकारांसाठी होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांचा पुढाकार

रेल्वे स्थानक परिसरातील गैरप्रकारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी संबंधित विभागांना यापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतर महापालिका आणि सिडकोच्या सहकार्याने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. रेल्वे स्थानक परिसरात वेळोवेळी अशा कारवाया केल्या जात असल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी या कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. संबंधित विभागांना याबाबत पत्रही देण्यात आले होते. रेल्वे स्थानकांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी सीवूड्स, किल्ले गावठाण आणि बेलापूर उड्डाणपुलाखाली सुमारे १५० पोलिसांच्या मदतीने कारवाई करून ४०० जणांवर कारवाई करण्यात आली होती. यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे काळे यांनी सांगितले.

नियमित देखरेख अपेक्षित

रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागा, पुलाखालील भाग आणि अंधाऱ्या कोपऱ्यांचा गैरप्रकारांसाठी वापर होत असल्यास केवळ एकदाच केलेली निष्कासन कारवाई पुरेशी ठरणार नाही. कारवाईनंतर संबंधित ठिकाणी पुन्हा बेघर किंवा गर्दुल्ले जमा होणार नाहीत, यासाठी महापालिका आणि सिडकोकडूनही नियमित देखरेख अपेक्षित आहे. पोलिसांकडून अशा ठिकाणी सातत्याने गस्त आणि तपासणी राहिल्यास स्थानक परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानक परिसरातील सार्वजनिक वापराच्या जागा सुरक्षित ठेवण्यासाठी तीनही यंत्रणांच्या समन्वयाची खरी कसोटी आता लागणार आहे.