नवी मुंबई : नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोर आणि बेघरांचा वाढता वावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मंगळवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्लास्टिकचे कॅरेट, दगड आणि हाताने मारहाण करण्यात आल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर स्थानकाबाहेरील परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरूळ सेक्टर २० मधील स्थानकाच्या पश्चिम बाजूस मंगळवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. चालताना धक्का लागल्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत देवनाथ ठाकूर आणि संगम चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर अशिबहुल शेख आणि राहुल शेख यांना किरकोळ दुखापत झाली. शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संजीव गुजूजी पवार याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा प्रकार केवळ एका वादापुरता मर्यादित नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानकाबाहेरील काही भागांत अनेक बेघर व्यक्ती ठाण मांडून राहत असून, रात्रीच्या वेळी या परिसरात नशेखोरांचा वावर वाढतो. नशेच्या अवस्थेत होणारे वाद, हाणामारी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान यामुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
अमली पदार्थांच्या कथित विक्रीमुळे चिंता
या परिसरात गांजा आणि अन्य अमली पदार्थांची कथित विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांतून मद्य खरेदी करून सार्वजनिक ठिकाणीच मद्यपान केले जात असल्याचेही सांगण्यात येते. महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार वाढल्याच्याही तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी करूनही पोलीस किंवा रेल्वे पोलिसांकडून या नशेखोरांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे.
दरम्यान, या परिसरात पोलिसांतर्फे वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचा दावा नेरूळ पोलिसांनी केला आहे. तसेच यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्थानक परिसरातील समस्या केवळ एखाद्या हाणामारीनंतरची तात्पुरती कारवाई करून सुटणार नाही. बेघरांचे अतिक्रमण, नशेखोरांचा वावर आणि सार्वजनिक मद्यपानाला आळा घालतानाच अमली पदार्थांच्या कथित विक्रीची चौकशी आणि रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
रेल्वे स्थानक परिसरातच मद्यविक्रीचे दुकान असल्याने अनेक जण मद्य खरेदी करून स्थानक परिसरातच मद्याचे सेवन करताना आढळतात. त्याशिवाय स्थानक परिसरातच बेघरांचे वास्तव्य असून, अनेकदा त्यांच्यात भांडणे आणि हाणामारी होत असते. त्यामुळे महिला म्हणून अशा परिसरातून प्रवास करताना अतिशय असुरक्षित वाटते. पोलीस आणि प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी अशी प्रवासी म्हणून आमची मागणी आहे. शामल सावंत, प्रवासी, नेरूळ
स्थानकाबाहेरील बेघरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेघरांना हटविण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू असून, लवकरच संयुक्त विद्यमाने स्थानक परिसरात योग्य ती कारवाई करण्यात येईल. अजय कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरूळ पोलीस ठाणे</strong>
