नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील मोकळी जागा अवैध पार्किंग, अस्वच्छता आणि बेघर व्यक्तींच्या वावरामुळे गैरप्रकारांच्या विळख्यात सापडली आहे. या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारीही पोलीस आणि महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा सिडकोकडून नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून तिचा नियोजनबद्ध विकास आणि सुशोभीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती तथा प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक गिरीष म्हात्रे यांनी या जागेच्या हस्तांतरणासाठी महापालिका आणि सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रेल्वे स्थानक परिसरातील जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासह परिसराचा विकास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नेरुळ रेल्वे स्थानकाकडे ये-जा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या परिसराचा वापर करतात. मात्र मोकळ्या जागेची योग्य देखभाल होत नसल्याने तेथे अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, जागेवर अस्वच्छताही पसरली आहे. बेघर व्यक्ती आणि गर्दुल्यांचा वावर वाढल्याने परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. परिणामी हा परिसर नागरिकांसाठी, विशेषतः महिलांसाठी असुरक्षित ठरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यास तेथे नियमित स्वच्छता, सुशोभीकरण, पादचारी सुविधा, नियोजित पार्किंग तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक विकासकामे करता येणार आहेत. यासाठी गिरीष म्हात्रे यांनी ४ सप्टेंबर रोजी महापालिकेकडे पत्र देऊन सदर जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ७ सप्टेंबर रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून नेरुळ रेल्वे स्थानक पश्चिमेकडील मोकळी जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.
रेल्वे रुळांलगतच्या घरांचाही प्रश्न
रेल्वे रुळांलगत सन २००० पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांवर होणारी कारवाई तात्पुरती थांबवून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबतही सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चर्चा झाली. नागरिकांचे हित लक्षात घेऊन या प्रश्नावर योग्य मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. जागेच्या हस्तांतरणासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर मंत्रालयातही बैठक झाली होती. नाईक यांनी महापालिका आयुक्तांना सिडकोकडून जमीन महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती नगरसेवक गिरीष म्हात्रे यांनी दिली.
