नवी मुंबई : शहरातील रेल्वे स्थानकांबाहेर रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळत आहे. विशेषत: नेरुळ येथील पूर्व भागात स्थानकाबाहेर पडणेही प्रवाशांना अवघड होत आहे. याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून उपप्रादेशिक विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

नेरुळ-उरण रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वीपासून नेरुळ ते खारकोपर मार्गावर शेअर रिक्षा चालवल्या जातात. हे रिक्षावाले रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच उभे राहतात. अनेकदा प्रवाशांची इच्छा नसतानाही रिक्षाचालक त्याच्या हाताला खेचून नेतात अशा तक्रारी काही महिला प्रवाशांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसथांब्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रचंड गोंधळ या परिसरात पाहायला मिळतो. एनएमएमटीचे येथे नियंत्रण केंद्र आहे. त्यांनाही हे रिक्षाचालक दाद देत नाहीत. याबाबत अनेकांनी पोलीस ठाण्यामध्येही तक्रारी दिलेल्या आहेत तरीही शेअर रिक्षावाल्यांची मनमानी या स्थानकाबाहेर पाहायला मिळते.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस तसेच नवी मुंबई परिवहन व्यवस्थापन यांनी कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. सिडकोने या ठिकाणी रिक्षाचालकांना स्थानकाजवळ प्रवेश बंदी आहे, असा फलक लावला असतानादेखील मनमानी चालू असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही आवश्यक आहे.

रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. उलवे भागात जाणारे रिक्षाचालक चक्क महिलांना जबरदस्तीने रिक्षात बसवतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना पत्र दिले आहे.- दिलीप आमले, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांबाबत योग्य तपासणी करुन कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रवाशाला जबरदस्तीने रिक्षात बसवता येणार नाही.- दत्तात्रय सागोळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई