नवी मुंबई : नेरूळ विभागात गुरुवारी (२६ फेब्रुवारी) आपत्कालीन शटडाऊन जाहीर करण्यात आल्याने संध्याकाळचा नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तांत्रिक बिघाड दुरुस्ती आणि अत्यावश्यक देखभाल कामांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने असून, पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासाठी शटडाऊन घेणे घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेरूळ परिसरातील विविध नोड्समध्ये संध्याकाळचा पाणीपुरवठा खंडित राहील. काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहण्याची किंवा पुरवठा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून आणि आवश्यक तेवढेच वापरावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवून ठेवावे, अनावश्यक नासाडी टाळावी तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांची तपासणी करून मर्यादित साठा नियोजनपूर्वक वापरावा, असे सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्ण असलेल्या कुटुंबांनी अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अचानक जाहीर झालेल्या शटडाऊनमुळे काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला असला, तरी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी संबंधित प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम राखून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.