नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या सुधारणा कामाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ५ कोटी २६ लाख २५ हजार ७८० रुपयांच्या जादा खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मांडण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या ८ कोटी ५५ लाख १६ हजार ८९३ रुपयांच्या तुलनेत सुधारित कंत्राटदाराची रक्कम १३ कोटी ८९ लाख ४२ हजार ६७३ रुपये झाली आहे. त्याचबरोबर कामाची मुदत ३१ मार्च २०२८ पर्यंत वाढविण्याचाही प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.

नेरुळ सेक्टर १९ ए येथील वंडर्स पार्कच्या सुधारणा कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. या कामासाठी महापालिकेने शहर अभियंता विभागाच्या २०१८-१९ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार केले होते. तिसऱ्या टप्प्याचे मूळ अंदाजपत्रक ६ कोटी ६८ लाख ९७ हजार १७८ रुपये होते. या कामासाठी मे. अश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट प्रा. लि. या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती.

तिन्ही टप्प्यांच्या कामासाठी ३० कोटी ११ लाख ४३ हजार ६३७ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यावर १२ टक्के वस्तू व सेवा करासह एकूण रक्कम ३३ कोटी ७२ लाख ८० हजार ८७३ रुपये झाली होती. त्यानंतर जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्याने कामाची सुधारित वित्तीय मंजुरी ३६ कोटी ७३ लाख ४७ हजार २७६ रुपयांवर पोहोचली.

वंडर्स पार्कच्या सुधारणा कामातील जादा खर्च आणि मुदतवाढीच्या प्रस्तावावर महासभेत निर्णय होणार आहे. त्यानुसार अतिरिक्त खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळते का आणि कामासाठी आणखी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाते का, हे स्पष्ट होईल.

अतिरिक्त कामांचा भार

तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी १८ टक्के जीएसटीसह ७ कोटी ८९ लाख ३८ हजार ६७० रुपयांचा कार्यादेश देण्यात आला होता. कामादरम्यान अतिरिक्त बाबींचा समावेश झाल्याने खर्चात वाढ झाल्याचे प्रस्तावात नमूद आहे. यासाठी निव्वळ ५ कोटी २६ लाख २५ हजार ७८० रुपयांचा जादा खर्च दर्शविण्यात आला असून, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. कामाच्या निविदेतील सर्वसाधारण अटींनुसार, वंडर्स पार्कमधील कामाचे स्वरूप दैनंदिन आणि आवश्यक असल्याने नवीन निविदा किंवा कार्यादेश मिळेपर्यंत काम सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही काम सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव

या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत होती. मात्र, सार्वत्रिक निवडणुका आणि आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी दर निश्चित करून मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कामाचे नाव – मंजूर निधी – नवीन प्रस्ताव

वंडर्स पार्क सुधारणा (टप्पा तीन) – ८,५५,१६,८९३ – १३,८९,४२,६७३

फॉर्म्युला-४ रेस ट्रॅक – ३१,९३,६०,२४४ – ३९,८३,२७,९७९