नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीचा मोठा भार उचलणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने यंदाच्या वर्षात प्रवाशांना वाढीव फेऱ्यांची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या २९५ बसेसपैकी ३० गाड्यांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने प्रवाशी फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे उपलब्ध बसेसवरील प्रवाशांचा भार वाढला असताना परिवहन प्रशासनाने सीएनजीवर धावणाऱ्या नव्या १५० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मार्च अखेरीस या बसगाड्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी एनएमएमटीच्या बळकटीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात ठोस अशी आर्थिक तरतूद केली होती. या अर्थसंकल्पात आयुक्तांनी नव्या बस खरेदीचा प्रस्तावही मांडला होता. एनएमएमटीच्या ताफ्यात प्रशिक्षित वाहक-चालकांची पुरेशी संख्या आहे. त्यामुळे भाडेपट्ट्यावर बस चालविण्याऐवजी नव्या गाड्या खरेदी करून उपलब्ध कर्मचाऱ्यांसह त्या वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. त्यानुसार सीएनजीवर धावणाऱ्या १५० नव्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बस येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कुडूस्कर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. नवी मुंबईतील वेगवेगळ्या मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासंबंधीचा सविस्तर आढावा आयुक्त डाॅ. शिंदे यांनी घेतला होता. त्यानुसार वाढीव बस कोणत्या मार्गावर सोडल्या जाव्यात यासंबंधीचा प्रस्तावही तयार केला जात आहे, असे कुडूस्कर यांनी स्पष्ट केले.

जुन्याच मार्गाचे बळकटीकरण

– सद्यस्थितीत एनएमएमटीच्या ताफ्यात ४४० बस. यापैकी ३२५ बस कार्यरत.

– मध्यंतरी एनएमएमटीच्या ताफ्यात २९५ वीजेवर धावणाऱ्या बस दाखल. मात्र यापैकी ३० बसेसमध्ये तांत्रिक दोष.

– या बसगाड्यांची दुरुस्ती करण्याऐवजी नव्या स्वरुपात त्या संबंधित कंपनीकडून दिल्या जाणार असल्याची कुडूस्कर यांची माहिती.

– नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उरण-पनवेल, खोपोली, मुंबई अशा वेगवेगळ्या ७५ मार्गावर एनएमएमटीच्या बस सेवेत.

– सीएनजीवरील नव्या १५० बस दाखल होताच नव्या मार्गांचा विचार करण्याऐवजी आहे त्या मार्गावर अधिक बस सोडून प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवासाचे समाधान मिळवून देण्याचा एनएमएमटीचा प्रयत्न.

नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढते नागरीकरण लक्षात घेता या संपूर्ण पट्ट्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि दर्जेदार बसेस त्यांच्या दिमतीला असाव्यात असा आमचा प्रयत्न राहिला आहे. या आखणीचा एक भाग म्हणून येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १५० नव्या बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. नवी मुंबईतून सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या मार्गावर वाढीव फेऱ्यासह गर्दीमुक्त प्रवासाचे समाधान प्रवाशांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने योग्य पद्धतीने आखणी केली जात आहे.- डाॅ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका