नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबई या दोन महत्वाच्या शहरांना जवळ आणणाऱ्या बहुचर्चित शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणारा सात किलोमीटर अंतराचा नवा सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला असून महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने या महत्वकांक्षी प्रकल्पास हिरवा कंदील दाखविल्याने या मार्गातील पुल उभारणीसाठी आवश्यक निवीदा प्रक्रिया सिडकोने सुरु केली आहे. शिवडी-न्हावाशेवा उड्डाणपूलावरुन उलवे भागातील शिवाजीनगर येथे एक मार्गिका सोडण्यात आली आहे. या मार्गिकेवरुन संपूर्ण उलवे उपनगराला खाडीच्या बाजूने समांतर असा हा किनारामार्ग थेट विमानतळाच्या दिशेने नेण्यात येणार आहे. नेरुळ-उरण रेल्वे मार्गिकेवरुन या मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु असून पुढील वर्षीपर्यत या विमानतळाचा पहिला टप्पा प्रवाशी सेवेसाठी खुला करण्याचे बेत केंद्र तसेच राज्य सरकारमार्फत आखण्यात आले आहेत. या विमानतळाच्या दिशेने मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांचा लोंढा बराच मोठा आहे. त्यामुळे या प्रवाशासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीला तसेच आखणीलाही गेल्या काही काळापासून सुरुवात झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा… नवी मुंबई : एन.एम.एम.टी. बसला आग; सुदैवाने जीवित हानी नाही

मुंबईच्या दक्षिण उपनगरांपासून थेट नवी मुंबईला जोडणारा शिवडी-न्हावाशेवा हा २२ किलोमीटर अंतराच्या सागरी सेतूमुळे हा प्रवास जवळपास एका तासाहून कमी होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळच्या दिशेने येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. नियोजनाप्रमाणे या सागरी सेतूची एक मार्गिका उलवे उपनगरास लागूनच असलेल्या शिवाजीनगर येथे तर पुढील मार्गिका ही न्हावाशेवालगत चिर्ले येथे उतरविण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील मार्गिकेवरुन विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी उलव्याच्या अंतर्गत भागावर वाहतूकीचा भार येऊ नये यासाठी सिडकोने या उपनगराला खाडीच्या दिशेने समांतर असा सात किलोमीटर अंतराचा सागरी किनारा मार्ग उभारण्याचे निश्चित केले आहे.

नवी मुंबईकरांसाठीही सोयीचा मार्ग

नवी मुंबई विमानतळाच्या पूर्वबाजूच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच उलवे नोडलगत असलेल्या आम्र मार्गापर्यंत एकही सिग्नल नसणारा या सुसाट मार्गामुळे मुंबईतून थेट नवी मुंबईत येणा-यांना हा मार्ग नवा पर्याय मिळणार आहे. या मार्गावरुन विमानतळाच्या दिशेने येत असताना डाव्या बाजूला वळून नवी मुंबईतील बेलापूर तसेच इतर उपनगरांच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका काढण्यात येणार असल्याने शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गावरुन बेलापूर, नेरुळ, सीवूड, सानपाडा अशी उपनगरांमधील प्रवाशांनाही सोयीचे ठरणार आहे. तसेच नवी मुंबईतील प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी उलवे आणि द्रोणागिरी मार्गे वळसा प्रवास करुन न्हावाशेवा शिवडी सागरी मार्ग गाठावा लागणार नाही.

पर्यावरण विभागाच्या मंजुऱ्या अंतिम टप्प्यात

मागील सहा वर्षांपासून सिडको प्रशासनाकडून यासंबंधी पर्यावरण विभागाच्या वेगवेगळ्या परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या मार्गात कांदळवने आणि पाणथळ क्षेत्राचा मोठा भाग येतो. सिडकोने यासंबंधीचा एक प्रस्ताव सागरी किनारा नियमक प्राधिकरणाकडे काही वर्षांपुर्वी सादर केला होता. त्यावर पर्यावरण विभागाने संबंधित प्रस्तावामध्ये काही त्रुटी सूचित केल्या होत्या. या त्रुटी दूर करुन सिडकोने सादर केलेल्या सुधारित प्रस्तावास किनारा नियमक प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आता केंद्रीय पर्यावरण विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सागरी किनारा नियमक प्राधिकरणातील वरिष्ठ सुत्रांनी लोकसत्ताला दिली.

असा असेल मार्ग

उलवे ते जेएनपीटी या सागरी मार्ग सात किलोमीटर लांबीचा असणार असून त्यावर सहा मार्गिका असणार आहेत. या सात किलोमीटर मार्गातील सागरी मार्ग हा ५.८ किलोमीटर लांबीचा असणार आहे. यातील सव्वा किलोमीटर अंतरात उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. वाहतूक सिग्नल नसलेला आणि ज्या ठिकाणी चौक आहेत अशा ठिकाणी उड्डाणपुल या मार्गावर असणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी मार्गावरुन प्रवास करणारे वाहनचालक उलवे येथील शिवाजी नगर आणि पुढे एनएच ४ बी येथून चिर्ले येथे उतरतील असे नियोजन होते. उलवे नोड येथील प्रस्तावित सागरी मार्गामुळे शिवडी न्हावाशेवा सागरी मार्गावरील शिवाजी नगर येथील मार्गासोबत पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित उलवे सागरी मार्गाला नेरूळ उरण रेल्वे मार्गावरुन तरघर रेल्वेस्थानकाजवळ उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.

शिवडी न्हवशेवा सागरी सेतू मुळे मुंबई – नवी मुंबई आणि रायगड जिल्हा एकमेकांच्या जवळ आला आहे. आज ज्या प्रवासाला दोन तास लागतात तो प्रवास २० मिनिटात पूर्ण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईच्या विमानतळावरील भार कमी होणार असून हे विमानतळ आणि सागरी सेतूदरम्यान उभारल्या जाणाऱ्या कनेक्टरमुळे विमानतळापर्यंतचा प्रवासही गतीमान होणार आहे. या विमानतळच्या अनुषंगाने मुंबई महानगर पट्ट्यात अनेक महत्वकांशी प्रकल्प, उद्योगधंदे उभे रहात आहेत. हे प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि सभोवतालच्या शहरांसाठी गेम चेंजर ठरणारे आहेत. लाखो प्रवाशांसाठी हे प्रकल्प लाभदायी ठरतील. केवळ वेळ आणि इंधनाचीच बचत होणरा नसून प्रदुषणही कमी होणार आहे. या भक्कम आणि वेगवान सेवांमुळे नवे आर्थिक केंद्र उदयाला येणार असून परिसराची आणि पर्यायाने लोकांची भरभराट होईल. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Story img Loader