विमानतळासाठी नव्याने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया

नवी मुंबई विमानतळ उभारणीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंत्यत आवश्यक मानल्या गेलेल्या पर्यावरणविषयक मंजुरीला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने सिडकोला नव्याने पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची शिफारस केली आहे.

पर्यावरण मंत्रालयाच्या शिफारशीनंतर सिडकोचा अहवाल

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ उभारणीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंत्यत आवश्यक मानल्या गेलेल्या पर्यावरणविषयक मंजुरीला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने सिडकोला नव्याने पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची शिफारस केली आहे. सिडकोने या संदर्भातील आपला अहवाल सादर केला असून नवीन पर्यावरणविषयक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

पहिली मंजुरी २२ नोव्हेंबर २०१० रोजी देण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरण मंत्रालयाने ३२ अटी व नियम घातले होते. यातील अनेक नियमांची पूर्तता सिडकोने करण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळाच्या आसपास वृक्ष लागवड केल्यास पक्षी, प्राण्यांचा संचार सुरू होईल आणि हा संचार विमान उड्डाणाला अडथळा ठरणारा असल्याने या ठिकाणी होणारे १०८ हेक्टरचे खारफुटी पार्क मात्र स्थलांतरित करावे लागणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला प्रस्ताव जुलै १९९७ मध्ये सादर करण्यात आला होता. अगोदर राष्ट्रीय विमानतळाचा असलेला हा प्रकल्प मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकींचा ताण पाहता एमएमआरडीए क्षेत्रातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये बदल करण्यात आला. या प्रकल्पासाठी एकूण २०६८ हेक्टर जमिनी संपादित करण्यात आली असून प्रकल्प प्रत्यक्षात ११६० हेक्टर जमिनीवर आहे. या ११६० हेक्टरमध्ये २५० हेक्टर असून यातील १०८ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. या प्रकल्पाला अतिशय महत्त्वाची असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नोव्हेंबर २०१० रोजी मिळाल्यानंतर हा प्रकल्प उभारणीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यानंतर २०१३ व २०१७ मध्ये या प्रकल्पाला सागरी नियंत्रण प्राधिकरणांच्या परवानग्या मिळाल्या. त्यानंतर सिडकोने विमानतळपूर्व कामांना सुरुवात केल्याने येथील मुख्य अडथळा असलेली उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण केलेले आहे. याच वेळी या टेकडीच्या दक्षिण बाजूस असलेली दुसरी छोटी टेकडीची उंची कमी करण्याचे सूचना विमानतळ प्राधिकरणाने केल्याने त्या टेकडीची उंची देखील कमी करण्यात आलेली आहे. याशिवाय उलवा नदीचा प्रवाह बदलण्याचे महत्त्वाचे काम झालेले आहे.

सिडकोने या प्रकल्पासाठी ९ हजार झाडे आतापर्यंत तोडलेली आहेत. त्यातील दीड हजार झाडांचे पुनरेपण करण्यात आलेले आहे. याशिवाय जिते या गावातही मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आल्याचा सिडकोचा दावा आहे. या विमानतळ प्रकल्पातील मुख्य निविदाकार जीव्हीके लेडऐवजी आता अदाणी  समूहाने विमानतळ उभारणीचे काम विमानतळ कंपनीचे भागभांडवल खरेदी करून घेतलेले आहे. त्यामुळे पुढील सर्व काम अदाणी समूह करणार आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पहिल्या पर्यावरणविषयक मंजुरीला या महिन्यात ११ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सिडकोने या प्रकल्पासाठी नव्याने पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची अट घालण्यात आली आहे. जुन्या मंजुरीत मंत्रालयाने ३२ अटी व शर्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. यातील अनेक कामे सिडकोने पूर्ण केली असून बदलण्यात आलेल्या अटी व शर्तीबद्दल नव्याने मंजुरी प्रस्ताव देण्यात आला आहे.

कांदळवन उद्यान स्थलांतरित?

मागील अकरा वर्षांत अनेक बदल या प्रकल्पात झालेले आहेत. विमानतळ परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षसंपदा निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांचा संचार वाढणार आहे. हा संचार विमान संचालनात अडथळा ठरणारा आहे. या सूचनेची दखल घेण्यात आली असून कांदळवन उद्यान स्थलांतरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या अनेक बदलांचा या नवीन पर्यावरणविषयक मंजुरीमध्ये समावेश राहणार आहे. हा प्रकल्प उभारणीला विलंब लागला असल्याची कबुली सिडको प्रशासनाने दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नवीन पर्यावरणविषयक मंजुरीची वाट पाहात असल्याचे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New environmental clearance process airport ysh

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या