नवीन गव्हाण उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक

दोन दिवसांपूर्वीच नव्याने उभारलेला गव्हाण फाटा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून त्यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे.

पुलावरून कंटेनर कोसळला; वेगमर्यादा नसल्याने वळणांवर धोका

उरण : दोन दिवसांपूर्वीच नव्याने उभारलेला गव्हाण फाटा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून त्यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. या पुलावर वाहनांच्या वेगमर्यादेबाबत बंधने घातली नसल्याने वळणांवर अपघांताचा धोका निर्माण झाला असून वाहनचालकांकडून भीती व्यक्त होत आहे. शनिवारी या पुलावरून जात असताना एक कंटेनर कोसळला, या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला आहे.

उरण-पनवेल तसेच नवी मुंबईला जोडणाऱ्या बहुमार्गी उड्डाणपुलांची उभारणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(एनएचआय) यांच्याकडून करण्यात येत आहे. गव्हाणफाटा, करळ तसेच जासई आदी भागांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. यातील काही पूल पूर्ण झाले आहेत तर काहींची कामे सुरू आहेत. जासई पुलाच्या उभारणीचे काम सुरू असताना नुकताच पुलाचा बीम कोसळला. यात एका कंत्राटी कामगाराला आपला जीव गमावावा लागला होता. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या गव्हाण फाटा येथील उड्डाणपुलावर कंटनेरचा अपघात झाला. त्यामुळे पुलाच्या रचनेविषयीही शंका उपस्थित होत आहे. हे कंटेनर वाहन गव्हाण फाटा येथून जाणाऱ्या जेएनपीटी ते पनवेलच्या मालवाहू रेल्वे मार्गावर पडल्याने नऊ  तास जेएनपीटी बंदरातील कंटेनर वाहतूक बंद होती. त्याचप्रमाणे या मार्गावरून तेलजन्य पदार्थाचीही रेल्वेने वाहतूक केली जाते त्याच्यावरही परिणाम झाला होता.  पुलावरून वाहतुकीला वेगमर्यादा नसल्याने भरधाव वाहनांचा वळणावर ताबा सुटण्याची शक्यता वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या पुलाच्या रचनेची पाहणी करीत सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या संचालकांशी संपर्क होऊ  शकला नाही.

वाहतूक कोंडी दूर होईल, सुरक्षेचे काय?

करळ येथील पुलावरून उरण-पनवेल, पनवेल-जेएनपीटी बंदर, चौथे बंदर ते पनवेल व नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हे पूल तयार करण्यात आले आहेत. तर गव्हाण फाटा येथे नवी मुंबई ते जेएनपीटी-उरण, जेएनपीटी ते कळंबोली-पळस्पे या मार्गाना जोडणाऱ्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल मात्र सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New gawan flyover dangerous traffic ysh

Next Story
उरणमध्ये कामगारांचा मोर्चा
ताज्या बातम्या