नवी मुंबई : सिडकोने नुकतीच तळोजा येथील ५,७३० आणि गेली अनेक वर्षे शिल्लक असलेली ७३८ अशा ६.५०८ घरांची सोडत काढली असून लाभार्थीना देखभाल खर्चासह घरांची सर्व रक्कम भरल्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया यंदा पूर्ण केली जाणार आहे. याच वेळी सिडको शिल्लक असलेल्या सुमारे दीड हजार घरांची सोडत पुढील महिन्यात काढणार आहे. मात्र सिडकोने यासाठी दराबाबत धोरण बदलण्याचे ठरवले असून नोडनुसार घरांचे दर आकारण्याची शक्यता आहे.
या घरांची अर्जविक्री एक मेपासून सुरू करण्याचा सिडकोचा प्रस्ताव होता, मात्र नुकतीच सहा हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत काढल्याने शिल्लक घरांची अर्ज विक्री पुढे ढकलण्यात आली आहे.
सिडकोने दोन वर्षांर्वी काढण्यात आलेल्या सोडतीचा पूर्ण रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना ताबा देण्याची प्रक्रिया राबविल्यानंतर जानेवारी व मार्चमध्ये दोन विक्री योजनांचा शुभांरभ करून एप्रिलमध्ये या घरांची सोडतदेखील काढलेली आहे. सिडकोने एक लाख दहा हजारांपेक्षा जास्त घरे बांधण्याचा संकल्प सोडला असून यातील अध्र्या घरांचे प्रत्यक्षात काम सुरू आहे.
सिडकोने जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर तळोजा येथे पाच हजारांपेक्षा जास्त घरांची गृहयोजना पूर्ण केली असून या घरांची अर्ज विक्री २६ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर मागील काही वर्षांत व्हॅलीशिल्प, अनिवासी संकुल आणि इतर गृह योजनेतील काही घरे आरक्षणाअभावी विक्रीविना शिल्लक होती. ही शिल्लक घरेदेखील सिडकोने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विक्रीस काढली आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेचा जास्त समावेश आहे. सिडकोने काढलेल्या शिल्लक घरांच्या विक्रीमुळे या उत्पन्न गटातील नागरिकांना घरे उपलब्ध झालेली आहेत. मात्र या घरांच्या किमती काहीशा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
तयार घरे विक्रीविना पडून सिडकोने २०१८ पासून काढलेल्या काही गृह विक्री योजनेतील काही घरे शिल्लक आहेत. अनेक ग्राहकांनी केवळ नशीब अजमावण्यासाठी भरलेले अर्ज बाद झाल्याने सिडकोची अनेक घरे शिल्लक आहेत. शिल्लक घरांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सिडकोने जानेवारी, मरच आणि आता मेमध्ये गृह विक्री योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बांधून पूर्ण झालेली घरे विक्रीविना ठेवणे हे सिडकोचे आर्थिक नुकसान करणारे असल्याने या घरांचा लवकरात लवकर विक्री करण्याचा सिडको प्रशासनाचा प्रयत्न आहे.
मोक्याच्या ठिकाणची घरे महागणार?
सिडकोने तळोजा, खारघर, द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली या विविध नोडमधील घरांचे दर सरसकट पद्धतीने लागू केले होते. यात मोक्याच्या घरांना चांगली मागणी राहिली व इतर ठिकाणची घरे शिल्लक राहिली. त्यामुळे सिडकोने आपले दर धोरण बदलण्याचा निर्णय घेतला असून नोडनुसार दर ठरवण्यात येणार आहेत. त्यामुळे घणसोलीसारख्या मोक्याच्या ठिकाणच्या घरांचे दर वाढणार आहेत, तर द्रोणागिरीत दर कमी होणार आहेत.
