‘ऐरोली-काटई उन्नत’ मार्गी

पारसिक डोंगरातून सुमारे दोन किमीचा बोगदा; महिनाभरात काम सुरू होण्याची चिन्हे

पारसिक डोंगरातून सुमारे दोन किमीचा बोगदा; महिनाभरात काम सुरू होण्याची चिन्हे

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील वाहनांच्या डोंबिवली, कल्याणच्या दिशेने जलद वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर मार्गापासून डोंबिवलीतील काटई नाक्यापर्यंत आखण्यात आलेल्या १२ किमी अंतराच्या महत्त्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठाणे-बेलापूर मार्गापासून पारसिक डोंगरातून पावणदोन किलोमीटर अंतराचा बोगदा काढला जाणार असून वन विभागाच्या परवानग्या, निवीदा प्रक्रियेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद आणि ठेकेदाराने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून बोगद्याचे काम लांबणीवर पडले होते. ही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत बोगदा आणि रस्त्याच्या कामासाठी तब्बल २३७ कोटी ५५ लाख रुपयांच्या निवीदेस मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असून हे काम येत्या महिनाभरात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरडीएने ऐरोली-काटई नाका या एकूण १२.३ किलोमीटर अंतराच्या उन्नत मार्गाची आखणी केली आहे. या प्रकल्पाच्या सोबत दिवा-ऐरोली खाडी पुलापासून आणखी एक उड्डाणपूल उभारण्यात येणार असून तो ऐरोलीतील अंतर्गत भागातून काटई नाका उन्नत मार्गास जोडण्यात येणार आहे. यामुळे पुर्व द्रुतगती महामार्गावरून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने येजा करणाऱ्यांना वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल असा एमएमआरडीएचा दावा आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग -४ असा एकूण साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गाची आखणी करण्यात आली आहे. या मार्गाच्या एकूण रॅम्पसहित २३९२ मीटर लांबी असलेल्या रस्त्याच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने यापूर्वीच १४४ कोटी ४७ लाख रुपयांच्या निविदेस आणि कामाच्या आरंभास मान्यता दिली आहे. या आखणीत पारसिक डोंगरातून काढण्यात येणारा बोगदा हा महत्वाचा टप्पा मानला जातो. पारसिक डोंगरातून जाणाऱ्या १.७० किलोमीटर अंतराच्या या बोगद्यासाठी एमएमआरडीएने २०१६ मध्ये पहिल्यांदा २५० कोटी रुपयांच्या कामाची निविदा मागविली होती. या प्रक्रियेस ठेकेदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एप्रिल २०१७ मध्ये पुन्हा निवीदा काढण्यात आली. यावेळी मेसर्स गॅमन इंडिया, मेसर्स आय.व्ही.आर.सीएल आणि एस.एम.सी इन्फ्रास्ट्रक्चर (भागीदारी) आणि मेसर्स पटेल इंजिनीअरिंग आणि एन.ए.कन्स्ट्रक्शन (भागीदारी) या ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरविण्यात आल्या होत्या. यापैकी पटेल इंजिनीअरिंग कंपनीची निविदा सर्वात कमी दराची असूनही भागीदार असलेल्या एन.ए.कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामातील त्रुटींमुळे ही निविदा अपात्र ठरविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. त्याविरोधात पटेल इंजिनीअरिंग कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला. या वादामुळे बोगद्याच्या कामाची निविदा अंतिम होऊनही न्यायालयीन प्रक्रियेत सापडली होती. मात्र पटेल इंजिनीअिरग कंपनीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावल्याने हे काम मेसर्स आय.व्ही.आर.सी.एल या कंपनीस देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. सुमारे २३७ कोटी ५५ लाख रुपयांची ५.०६ टक्के कमी दराची निविदा नुकतीच स्वीकारण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रक्रियेनंतर या कामास त्यामुळे सुरुवात होईल, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New road projects in navi mumbai