रात्रीचा प्रवास धोकादायक

औद्योगिक वसाहतीत चार हजारांच्या आसपास छोटे-मोठे कारखाने असून लाखो लोकांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

‘एमआयडीसी’त अंतर्गत रस्त्यांवर अंधार

शेखर हंप्रस
नवी मुंबई : खड्डेमय रस्त्यांमुळे एमआयडीसीतून खडतर प्रवास सुरू असताना रात्रीच्या वेळी अंतर्गत रस्त्यांवर अंधार पडत असल्याने वाहनचालकांसाठी धोक्याचा प्रवास ठरत आहे. अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत तर काही ठिकाणी ते सुरू असून झाडांआड गेल्याने रस्त्यांवर अपुरा प्रकाश पडत आहे.

औद्योगिक वसाहतीत चार हजारांच्या आसपास छोटे-मोठे कारखाने असून लाखो लोकांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. शिवाय विदेशी चलनसुद्धा मिळते. बहुदेशीय अनेक कंपन्या या ठिकाणी असून कॉल सेंटरचे जाळे उभे राहिले आहे. दिघ्यापासून शिरवणेपर्यंत विस्तीर्ण आशा या औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांअभावी मोठी गैरसोय सुरू आहे. रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने येथून प्रवास नकोसा झाला आहे. दिवसाही प्रवास करणे कठीण होत असताना आता प्रकाशाअभावी रात्रीचा प्रवासतर अधिकच खडतर झाला आहे.

महापे, रबाळे, तुर्भे, शिरवणे पट्टय़ांत सुमारे ५५ किलोमीटरच्या रस्त्यांची अवस्था खराब आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम सुरू असल्याने तथे विजेचे खांबच नाहीत. त्यामुळे प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधारातून खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन दुचाकीचालकांना प्रवास करावा लागत आहे.

या औद्योगिक वसाहतीत दिघ्यापासून शिरवणेपर्यंत चार मोठय़ा झोपडपट्टय़ा आहेत. या ठिकाणी मात्र चांगली परिस्थिती आहे. झोपडपट्टी भागात नगरसेवक असल्याने त्यांनी पाठपुरावा केल्याने तेथे मात्र पथदिवे चालू स्थितीत आहेत.

दिघा ते शिरवणे या भागात सुमारे दोन हजार पथदिवे आहेत. यात महापे, रबाळे, खैरणे भागांत १००० तर तुर्भे-शिरवणे या भागात ९५० पथदिवे आहेत. मात्र यातील अनेक पथदिवे नुसते नावाला आहेत. ते बंद असल्याने त्याची वेळेवर देखभाल होत नाही. तर अनेक ठिकाणी असलेले पथदिवे रस्त्यांच्या कामांमुळे काढलेले आहे. काही ठिकाणी पथदिवे सुरू आहेत. मात्र त्याचा प्रकाशच रस्त्यांवर पडत नाही. झाडांआड हे पथदिवे असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर प्रकाश असला तरी एमआयडीसीतील बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर रात्री अंधार पडलेला असतो.

असा सर्वाधिक प्रकार रबाळे एमआयडीसी भागातील ‘आर’ विभागात असल्याची माहिती माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिली. या शिवाय तुर्भेतील सविता केमिकल्स, फायझर रस्ता या ठिकाणी अत्याधुनिक आणि चांगल्या अवस्थेतील पथदिवे बसविण्यात आले आहेत,  मात्र अनेकदा हे सुद्धा पथदिवे बंद असतात, अशी माहिती येथील एका कंपनीत काम करणारे धर्मेंद्र सिंह यांनी दिली. तर सविता महाजन आणि श्रेया शर्मा या महिला कामगारांनी अंधार असल्याने रात्री येथून प्रवास असुरक्षित वाटतो. त्यामुळे अंधार पडण्याआधीच ठाणे-बेलापूर महामार्ग गाठावा लागते असे सांगितले. त्यात या अंधाराचा गैरफायदा घेत चोरीचे प्रकारही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पथदिवे सुस्थितीत असल्याचा प्रशासनाचा दावा

याबाबत अधिक माहिती देताना रबाळे, महापे या विभागाचे विद्युत अभियंता प्रवीण गाढे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे तेथे काम संपल्याशिवाय पथदिवे बसवले जाऊ  शकत नाहीत. अन्य ठिकाणी पथदिवे आहेत. तर दुसरे विद्युत अभियंता सुनील लाड यांनीही रस्ते पूर्ण झाल्यावर पथदिवे लावण्यात येतील असे सांगत बहुतांश ठिकाणी पथदिवे व्यवस्थित असल्याचा दावा केला आहे.

आम्ही ज्या ठिकाणी रस्ते बनवत आहोत त्या ठिकाणी लवकरच पथदिवे बसवण्यात येतील. आता ज्या ठिकाणी पथदिवे आहेत ते सुस्थितीत आहेत.

 – एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Night travel dangerous darkness internal roads midc ssh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या