scorecardresearch

मशिदींच्या आवारात स्वच्छतेचा घोष!

केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची नवी मुंबईत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी,

मशिदींच्या आवारात स्वच्छतेचा घोष!
नवी मुंबई महानगरपालिका

केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचा पुढाकार

केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापनाची शहरात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी नवी मुंबई पालिका सर्व स्तरांवर प्रयत्न करीत असून पवित्र रमजाननिमित्त शहरातील पाच प्रमुख मशिदीत नमाज काळात स्वच्छतेविषयी प्रबोधन केले जाणार आहे. त्यानुसार पालिकेचे अधिकारी या काळात स्वच्छता व ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण याचे महत्त्व मुस्लीम बांधवांना पटवून देणार आहेत. यासाठी ५ जून रोजी केंद्र सरकारच्या वतीने देशातील चार हजार शहरांत ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी कचराकुंडय़ा वितरित होणार आहेत.

केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची नवी मुंबईत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासकीय विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ऐरोली सेक्टर १६, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ, वाशी सेक्टर चार, नेरुळ सेक्टर १६ आणि शहाबाज गावातील मशिदीत नमाजाच्या वेळी स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहेत. यासाठी मशिदीत अजान झाल्यानंतर इप्तार दरम्यान निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी तसेच घरी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, याबाबत पालिकेचे अधिकारी मुस्लीम बांधवांना प्रबोधन करणार आहेत.

गाव आणि झोपडपट्टय़ांमध्ये प्रबोधनाची गरज

माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या गृहनिर्माण संकुलातील घनकचरा न उचलण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ८० टक्के सोसायटय़ांमध्ये या नियमाची अंमलबजावणी होत आहे. पण नवी मुंबई शहर हे ग्रामीण व झोपडपट्टी भागांमध्ये विभागले असल्याने या भागात हे वर्गीकरण अद्याप गळी उतरलेले नाही. त्यामुळे पालिका आता या भागावर लक्ष केंद्रित करणार असून एक लाखापेक्षा जास्त कचराकुंडय़ा गाव व झोपडपट्टी भागात वितरित करणार आहे.

नवी मुंबई पालिकेने  नेहमीच स्वच्छतेला महत्त्व दिलेले आहे. त्यामुळेच ५ जूनपासून स्वच्छतेसाठी ग्रामीण व झोपडपट्टी भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरू असलेल्या रमजान काळात मुस्लीम बांधवांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजावे म्हणून प्रबोधन केले जाणार आहे.

-तुषार पवार, उपायुक्त (घनकचरा) नवी मुंबई पालिका.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2017 at 03:44 IST

संबंधित बातम्या