मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण; गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘साथ’ आटोक्यात

नवी मुंबई : दरवर्षी पावसाळा काळात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असतात. मात्र यावर्षी हे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचा एकही रुग्ण शहरात सापडला नाही, तर मलेरियाचे फक्त नऊ रुग्ण सापडले आहेत. पालिकेकडून करोना काळातही याबाबत दक्षता घेतली जात असल्याने साथीच्या रोगांचा प्रभाव कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

दरवर्षी पावसाळा कालावधीत हिवताप, डेंग्यू आजार तसेच इतर जलजन्य आजार वाढत असतात. यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा एप्रिलपासून नियमित स्वरूपात सुरू असतात. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबरोबर रासायनिक धुरीकरणही करण्यात येते. आठवडय़ातून दोनदा डासअळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. यावर्षी सर्व आरोग्य यंत्रणा करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी झटत असल्याने इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष होवून हे आजार वाढतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पालिका प्रशासनाने करोनाबरोबर साथरोग आजारांबाबतही दक्षता घेतल्याचा दावा पालिकेने केला आहे.

डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेत ५ लाख ३५ हजार घरांना भेटी देण्यात आल्या असून ११ लाख १५ हजार ५१० डास उत्पत्ती स्थानांची पाहणी करण्यात आली. यात ३ हजार १४७ ठिकाणची डास उत्पत्ती स्थाने दूषित आढळली होती. यातील १ हजार ५७४ स्थाने त्वरित नष्ट करण्यात आली असून १ हजार ५७३ स्थानांवर डासअळीनाशक फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.  यामुळे इतर साथीच्या आजारांचे प्रमाण कमी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान ताप, खोकला, सर्दीचे एकूण रुग्ण १ लाख २१ हजार ६८६ होते तर यावर्षी ऑगस्टपर्यंत ६९ हजार ८३२ इतकेच रुग्ण आहेत. यात गेल्या वर्षी मलेरियाचे ५२ रुग्ण सापडले होते. यावर्षी फक्त ९ रुग्ण आहेत. तर डेंग्यूचे गेल्या वर्षांत सात रुग्ण होते, यावर्षी एकही रुग्ण नाही. डेंग्यू संशयित फक्त पाच रुग्ण आहेत.

साथ रोगाबाबत पालिका प्रशासन काम करीत असून यावर्षी रुग्णसंख्या कमी आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पालिकेकडून योग्य उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी घरात एक दिवस पाणी साठवण्याची भांडी रिकामी करून ठेवावीत.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका