नवी मुंबई : २०२७ मध्ये होणाऱ्या देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, फील्ड ट्रेनरचे विशेष प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणामुळे जनगणना प्रक्रियेसाठी स्थानिक यंत्रणा सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेली ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी १ ते १५ मे या कालावधीत ‘स्वगणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असून, सुरक्षित संकेतस्थळाच्या माध्यमातून कुटुंबाची माहिती स्वतः भरता येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जनगणना कार्य निदेशालय, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात ६ ते ११ एप्रिलदरम्यान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महापालिकेच्या आठ विभाग कार्यालयांतील ४५ फील्ड ट्रेनर सहभागी झाले. मास्टर ट्रेनर तेजल कटारे तसेच महापालिकेचे उपअभियंता स्वप्नील देसाई यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
बेलापूर येथील सेक्टर ८ मध्ये या फील्ड ट्रेनरना प्रत्यक्ष प्रगणक म्हणून सरावही करून घेण्यात आला. पुढील टप्प्यात हेच प्रशिक्षित फील्ड ट्रेनर २६ एप्रिल ते ८ मेदरम्यान सुमारे ५०० पर्यवेक्षक आणि ३१०० प्रगणकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर हे कर्मचारी १६ मे ते १५ जूनदरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.
या प्रशिक्षणादरम्यान अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, उपआयुक्त सोमनाथ पोटरे, डॉ. कैलास गायकवाड, डॉ. अमोल पालवे तसेच उपआयुक्त व शहर जनगणना अधिकारी संजय शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
