नवी मुंबई – शहरात पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देश पत्रांची छाननी देखील पार पडली. तसेच निवडणुकीच्या काळातील कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला. यावेळी सुनियोजित आणि पारदर्शकरित्या निवडणुकांसाठी विविध सूचना देण्यात आल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. अशातच निवडणुकीच्या कार्यकाळात सर्व कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध योजना आखल्या जात आहेत. याकरिता नवी मुंबई पालिकेची आढावा बैठक पार पडली. यात निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व विभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभाग अधिकारी यांनी निवडणुक कालावधीतील कामांबाबत सूचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ.राहुल गेठे, निवडणूक उपआयुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि निवडणूकविषयक विविध बाबींसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी निवडणूक चिन्ह नेमून देणे, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी करणे, मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण, पहिल्या प्रशिक्षणाच्या दिवशीच त्यांना माहितीपुस्तिका देणे, मतदान अधिकारी यांच्या मतदान केंद्रनिहाय नेमणूका, ईव्हीएम मशिन हाताळणी प्रशिक्षण, मतदान साहित्याची मतदान केंद्रनिहाय उपलब्धता, स्ट्राँग रुम व्यवस्था अशा विविध बाबींबाबत मार्गदर्शन केले.

राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारांना सर्व गोष्टींची नियमित माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच, दुसऱ्याच दिवशी मतमोजणी असल्याने त्या कामाकरिता आवश्यक कर्मचारी आणि त्यांचे प्रशिक्षण नियोजनबद्ध पद्धतीने करावे अशी सूचनाही बैठकीत देण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभागांकरिता मतदान होणार असल्याने, मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार आणि प्रसार वाढवावा, अशी सूचना आयुक्तांनी दिली. तसेच, सर्व मतदान केंद्रांची जीपीएस टॅगींग करणे, पार्कींग व्यवस्थेची आणि सीसीटीव्ही निगराणीतील मतदान केंद्रांची व्यवस्था असावी याबाबतही निर्देश दिले.

पारदर्शक निवडणुकीसाठी नियम

निवडणूक केंद्रे वेबकास्टिंग करणार असून, संबंधित जागा पुरेशा कालावधीआधी ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था आणि प्रत्येक विभागात मॉडेल पोलींग स्टेशन सुनिश्चित करण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

जाहिरातींसाठी समान संधी

जाहिरातीसाठी जागा उपलब्धता आणि मैदान उपलब्धतेबाबत सर्वांना समान संधी देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, जिओ टॅगींग पद्धतीचा वापर जाहिरात फलकांवर करण्याच्या सूचना केल्या. मतदारांना मतदान चिठ्ठ्या वाटण्याचे काम बीएलओ मार्फत सुरू करण्यात येणार आहे.