रस्ते दुरुस्तीच्या कामांत पालिकेची संथगती
गणरायाचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांवरून होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले काम अद्याप अपूर्णावस्थेत असल्याचे चित्र आहे. यंत्राच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे (पॅचिंग) काम पालिका ५ सप्टेंबपर्यंत पूर्ण करेल, अशी शक्यता नसल्याने नागरिकांना लाडक्या देवाला खड्डय़ांचे विघ्न पार करूनच मखरात बसवावे लागणार आहे. शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. याबाबत काही गणेशोत्सव मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ ऑगस्टपर्यंत गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र कंत्राटदारांनी हा आदेश गांभीर्याने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.




जूनच्या मध्याला सुरू झालेल्या आणि त्यानंतर जुलै महिन्यात संततधार बरसलेल्या पावसाने नवी मुंबईतील बहुतेक रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण बनली आहे. गेले १५ दिवस पाऊस गायब झाल्यानंतर पालिकेने रस्त्यातील मोठे खड्डे बुजविण्यासाठी काम हाती घेतले. कंत्राटदारांनी रस्ते दुरुस्तीच्या कामात संथपणा ठेवल्याने गणेश आगमनापूर्वी खड्डे बुजविण्याची मुदत उलटून जाण्याची शक्यता आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पालिका विविध उपाययोजना करते. गणेशोत्सवापूर्वी सर्व कामे पूर्ण करणे ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. यंदा मात्र प्रशासनाने याकडे पाठ फिरवली आहे. शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची डागडुजी होणे गरजेचे होते. परंतु अद्याप उपाययोजना सुरू आहेत. गणेशोत्सवाआधी रस्त्यावरील खड्डे बजुवावे अशी मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.
ठाणे-बेलापूर मार्ग, सायन-पनवेल रोड, तुभ्रे-शिरवणे समांतर रस्ता, रामनगर ते रबाले एमआयडीसी रस्ता, गोठिवली ते ऐरोली अंतर्गत रस्ता, कोपरखरणे ते घणसोली रस्ता आदी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील असे सांगितले.