नवी मुंबई : डान्स बार वा हुक्का पार्लरमध्ये अंतर्गत छुपे मार्ग, ग्राहकांना लपण्यासाठी जागा तयार करण्यासाठी मोठे अंतर्गत बदल केल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच बार असलेल्या इमारतींची संरचना तपासणीबाबत पालिका प्रशासनाला कळवण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. याबाबत आता पालिकेला स्मरणपत्र देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांना याबाबत विचारणा केली असता, अंतर्गत बदल जागा मालक करू शकतो, असे सांगत जर त्या इमारतीला धोका होईल असे बदल केल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असे उत्तर दिले.

नवी मुंबईत बंदी असूनही डान्स बार वा बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईत वारंवार समोर येत आहे. टाळेबंदी असतानाही हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. सतरा प्लाझा येथील एक डान्सबारवर करोनाकाळातही सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली होती. महिन्याला किमान दोन ते तीन कारवाया होतात. मिळालेल्या माहितीनुसार कारवाईपूर्वी संबंधित बार ग्राहकांनी भरलेला असतो, मात्र कारवाई केल्यानंतर ग्राहक अचानक कुठे गायब हा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. २०१६ मध्ये जुहूगावातील एका बारवर धाड टाकल्यावर दोनशे ते अडीचशे ग्राहक होते, मात्र चौकशी करताना अवघ्या काही मिनिटांत सर्व ग्राहक गायब झाले होते.

बारमध्ये अनेक छुपे मार्ग आढळून आले असून लपण्यासाठी काही जागाही करण्यात आल्या आहेत. एखद्या गुहेत शिरल्याप्रमाणे हे मार्ग बनवण्यात आले आहेत. यासाठी इमारतीत बेकायदा मोठे अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. याबाबत पालिका प्रशासनाला कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे बारमध्ये प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. संशयित कोणी आढळल्यास लगेच सतर्क केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.

अंतर्गत बदल जागामालक करू शकतो. व्यावसायिक ठिकाणी इमारतीला धोका होईल असे बदल आढळून आले तर कारवाई केली जाईल. या संदर्भात तक्रार आलेल्या नाहीत.

अमरीश पटणेगिरी, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका

अंतर्गत रचनेत अनेक बदल केलेले असतात. खास करून ग्राहकांना, बारबालांना लपवण्यासाठी तसेच बाहेर पडण्याचे गुप्त रस्ते केलेले अनेक कारवाईत आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वच बारचे संरचना तपासणी करण्याबाबत महापालिकेला पत्र पाठवून कळवण्यात आले आहे, मात्र कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा