नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेशी संबधित सेवा मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. मालमत्ताकर व पाणी देयकाची माहिती व भरणा करण्यासाठी ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ ही अत्याधुनिक कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे.
नागरिक महानगरपालिकेची वेबसाइट www.nmmc.gov.in तसेच My NMMC ॲप यावरुन आपली देयक रक्कम भरु शकतात. याशिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व यूपीआय सुविधांद्वारेही करभरणा सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये आता ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ ही नवी डिजीटल सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना मालमत्ताकर तसेच पाणीपट्टी विषयक माहिती आणि देयक भरणासह इतर सेवा व्हॉट्स ॲपवर सहज उपलब्ध असणार आहेत. याकरिता ८२९१९२०५०४ हा नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबॉट क्रमांक असून ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकावर केवळ ‘Hi’ असा संदेश पाठवायचा आहे. यानंतर चॅटबॉट त्या व्यक्तिशी संवाद साधेल.
सुरुवातीला मराठी अथवा इंग्रजी असा भाषेचा पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. त्यानंतर मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी यापैकी माहिती हवी असलेली सेवा निवडावी लागेल. मग आपला मालमत्ता आयडी किंवा पाणी ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर मालमत्ता कराची माहिती किंवा पाणी बिलाची माहिती, नवीन बील प्रत, थेट पेमेंट लिंक मिळवता येईल. याद्वारे नागरिक आपल्या देयक रक्कमेची माहिती मिळवू शकतात तसेच थेट पेमेंट लिंकव्दारे आपली देयक रक्कमही भरणा करु शकतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सुलभ रितीने सेवा उपलब्ध व्हाव्यात या करिता महानगरपालिका प्रयत्नशील असून ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ हे पारदर्शक, जलद व सुलभ सेवा देण्यासाठी महानगरपालिकेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. नागकिांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.