मालमत्त कर भरण्यासाठीची २१ दिवसांची मुदत समाप्त; महापालिका आयुक्तांचा निर्णय
शहरात मोठ्या रकमेचा मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांना नोटीस बजावूनही २१ दिवस झाले असून मुदत संपल्याने थकबाकीदारांविरोधात प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे.

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असून त्यामधूनच नागरी सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येते. अनेक नागरिक प्रामाणिकपणे आपला मालमत्ता कर नियमित भरत असतात. तथापि मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करून आणि त्यास मुदतवाढ देऊनही त्या सवलतीचा लाभ न घेणाऱ्या आणि त्यानंतर पुढील जप्ती, लिलाव कारवाईची नोटीस बजावूनही त्याची दखल न घेणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  मालमत्ता करासंदार्भात नुकतीच पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मालमत्ताकर विभागातील प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या विभागीय क्षेत्राला दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध काम करावे, असे पहिल्याच बैठकीत आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्यास अनुसरून प्रत्येक विभागातील मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांपासून कमी रकमेच्या थकबाकीदारांपर्यंत उतरत्या क्रमाने यादी तयार करून त्या अनुषंगाने अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईचा प्रकरणनिहाय तपशील आयुक्तांनी घेतला. यंदाच्या आर्थिक वर्षात १६३ कोटी मालमत्ता कर वसुली झालेली असून अधिक वेगाने काम करावे, असे आयुक्तांनी निर्देश दिले. मोठ्या रकमेची थकबाकी असणाऱ्या ३१ मार्च २०२१ पूर्वीच्या २६ मालमत्ता कर थकबाकीदारांना १ ते १५ जून या कालावधीत मालमत्ता जप्ती, लिलावाच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे १६ जून ते २ जुलै कालावधीत ४९ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर त्यानंतर ३ ते १५ जुलै  या कालावधीत आणखी ५३ थकबाकीदारांवर जप्ती, लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बेलापूर विभागातील ३ मालमत्ता, नेरूळ विभागातील ९ मालमत्ता, वाशी विभागातील ६ मालमत्ता, तुर्भे विभागातील ९ मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील ११ मालमत्ता आणि घणसोली विभागातील ८ मालमत्ता व ऐरोली विभागातील ७ मालमत्तांचा समावेश आहे. या ५३ मालमत्ताधारकांची ७५ कोटी ९६ लाखांहून अधिक रकमेची मालमत्ता कर थकबाकी आहे. अशा प्रकारे आतापर्यंत १२८ मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यातील नोटीस मुदत संपलेल्या थकबाकीदारांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जे नागरिक प्रामाणिकपणे करभरणा करीत आहेत त्यांना विनात्रास करभरणा करता यावा याकरिता विविध ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमानतेने करावी, असे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.

शहरातील थकबाकीदारांना रीतसर नोटिसा बजावल्या आहेत. मुदतीनंतरही भरणा न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. मालमत्ता कर शहराचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून थकबाकीदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका