नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील आजुबाजुच्या सर्वच मुख्य शहरात पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र असताना नवी मुंबई महापालिका मात्र शहरातील रहिवास वापराबाबत वाहनतळाच्या आवश्यकतेबाबतचा अंतिम प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवणार आहे. त्यामुळे अत्यंत चांगली पार्किंग व्यवस्था व त्याबाबतचे धोरण निश्चित होईल अशी आशा नवी मुंबईकर नागरिकांना आहे.

मुंबई महानगर व आजुबाजुंच्या शहरात पार्किंगबाबतचा सर्वात मोठा व बिकट प्रश्न निर्माण झाला असून नवी मुंबई महापालिकेने मात्र पार्किंगबाबत धोरण निश्चितीसाठी पावले उचलली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने १ जानेवारी जाहीर केलेल्या नियमांमध्ये रहिवासी इमारती, बंगले तसेच बैठ्या घरांबाबतच्या पार्किंगची आखणी केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका बांधकाम नियमावलीतील पार्किंग नियमांबाबत याचिका क्र. १२३/२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी आदेश पारित करुन नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राच्या बांधकाम नियमावलीमध्ये रहिवास वापराकरिता आवश्यक असलेल्या पार्किंगच्या आवश्यकतेबाबत महापालिका आयुक्त यांनी तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करावी आणि समितीने शासनास योग्य त्या शिफारशी कराव्यात असे आदेशित केलेले होते. त्याच अनुषंगाने महापालिकेने पार्किंगबाबत नागरिकांकडून ऑनलइन माहिती घेतली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त यांचे मान्यतेने तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली. तसेच तज्ज्ञांची मतेही पालिकेने विचारात घेतली. त्यामुळे आता पालिका पार्किंगबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वाशीमधील सामाजिक कार्यकर्ते व नियोजन क्षेत्रातील अभ्यासक संदीप ठाकूर यांनी यांनी नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायलयानेही फेरआढाव्याबाबत व नियोजनाबाबत पालिकेला निर्देश दिले होते.

नवी मुंबई महापालिकेने शहरातील रहिवासी पार्किंगबाबत तज्ज्ञ समिती नेमली होती. त्यांची मतेही घेतली आहेत. तसेच नज्रिरीकांकडूनही हरकती सूचना मागवल्या होत्या. नवी मुंबई शहरातील चांगल्या व सुयोग्य पार्किंगबाबतचा अहवाल अंतिम अहवाल मंजुरीसाठी लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. – सोमनाथ केकाण,सहाय्यक संचालक, नगररचना विभाग

नवी मुंबई महापालिकेने शहरातील रहिवासी पार्किंगबाबतचे तयार केलेला प्रस्ताव अत्यंत चांगला आहे. त्यात काही सुधारणा व सूचनाही सुचवण्यात आल्या आहेत. आगामी काळात शासनाने योग्य निर्णय घेतल्यास नवी मुंबईत देशातील सर्वात चांगली पार्किंग व्यवस्था असाणारे शहर ठरेल अशी आशा आहे. संदीप ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते, नियोजन अभ्यासक