नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील १५ संवर्गांमधील १६० पदांसाठी गुणवत्ता यादी, निवडसूची आणि प्रतीक्षायादी बुधवारी (७ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. लेखा लिपिक, कक्षसेविका, कक्षसेवक यांसह विविध पदांचा या यादीत समावेश असून, निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच नियुक्तीची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
महापालिकेच्या नियमित आस्थापनेवरील गट-क आणि गट-डमधील ३० संवर्गांतील पदे सरळसेवेने भरण्यासाठी २७ मार्च २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील २८ परीक्षा केंद्रांवर १६, १७, १८ आणि १९ जुलै २०२५ रोजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील ३० संवर्गांचे गुणपत्रक ११ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार जाहिरातीत नमूद संवर्गनिहाय आणि श्रेणीनिहाय रिक्त पदांच्या संख्येच्या आधारे पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा विचार करून १५ संवर्गांची गुणवत्ता यादी, निवडसूची आणि प्रतीक्षायादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.
यामध्ये कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनीअर) सहा, उद्यान अधीक्षक एक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक, सांख्यिकी सहाय्यक तीन, ईसीजी तंत्रज्ञ आठ, सीएसएसडी तंत्रज्ञ पाच, आहार तंत्रज्ञ एक, नेत्र चिकित्सा सहाय्यक एक, आरोग्य सहाय्यक (महिला) १२, पशुधन पर्यवेक्षक दोन, ध्वनीचालक एक, लेखा लिपिक ५८, शवविच्छेदन मदतनीस चार, कक्षसेविका/आया २८ आणि कक्षसेवक २९ पदांचा समावेश आहे.
निवडसूचीत नावाचा समावेश झाला म्हणजे संबंधित उमेदवाराची नियुक्ती निश्चित झाली, असा अर्थ नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. निवडसूचीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, नॉन-क्रीमीलेअर तसेच खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, दिव्यांग आणि अनाथ या समांतर आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास, आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून अवैध ठरल्यास किंवा संबंधित उमेदवार अन्य आवश्यक पात्रता पूर्ण करीत नसल्याचे आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही. तसेच नियुक्तीपूर्वी आवश्यक वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे.
दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत नियुक्तीपूर्वी वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित पदासाठी उमेदवार सक्षम नसल्याचे आढळल्यास किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नाव निवडसूचीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित दिव्यांग उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाहीत.
कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक नंतर
निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरील सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कागदपत्र पडताळणी आणि निवड समितीच्या मान्यतेनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
