नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पाणीपट्टी वसुलीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ११२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, महापालिका स्थापनेनंतर एका आर्थिक वर्षातील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे.

शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महापालिकेच्या नियोजनबद्ध मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वेळेत पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यामुळे वसुलीला मोठी चालना मिळाली असून, त्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आभार मानले आहेत.

या यशामागे प्रशासनाने राबविलेल्या पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धतीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते. ऑनलाईन पेमेंट, क्यूआर कोडद्वारे देयक भरण्याची सुविधा, तसेच डिजिटल माध्यमांचा व्यापक वापर यामुळे नागरिकांना पाणीपट्टी भरणे सुलभ झाले. एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअॅप संदेश आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने थकबाकी वसुलीला गती मिळाली.

अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही मोहीम प्रभावीपणे राबवली. मार्च २०२६ दरम्यान नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पाणीपट्टी संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.