नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ येथील नैवेद्य आणि अलबेला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रांवरून निर्माण झालेल्या वादात राज्य सरकारने नवी मुंबई महानगरपालिकेचा ठराव अवघ्या दोन्न दिवसांत निलंबित केला आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ केकाण यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने मंजूर मंगळवारी केलेला ठराव राज्य सरकारने गुरुवारी (५ नोव्हेंबर) तात्काळ प्रभावाने निलंबित केला. शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीला संबंधित बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे देताना कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.
वाशी सेक्टर ९ येथील नैवेद्य आणि अलबेला या दोन गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींना बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे देताना केकाण यांनी गंभीर चुका केल्याचा तसेच जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी महापालिकेने २२ जुलै २०२६ रोजी ठराव मंजूर केला. केकाण यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना मूळ विभागात परत पाठविण्यासह त्यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची भूमिका घेण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी २७ जुलै रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. समितीने १६ सप्टेंबर रोजी अहवाल सादर केला. संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे, उपलब्ध अभिलेख, तत्कालीन विकास नियंत्रण नियमावली, एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर), शासनाचे निर्देश आणि कायदेशीर अभिप्रायांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर संबंधित इमारतींच्या बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे समितीने स्पष्ट केले. महापालिकेच्या ठरावातील आरोप आणि चौकशी समितीच्या निष्कर्षांमध्ये तफावत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
दरम्यान, ३ नोव्हेंबरच्या महासभेत केकाण यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव चर्चेला आला होता. माजी उपमहापौर भरत नखाते यांनी अवनी आणि नैवेद्य पुनर्विकास, ३२ मीटर रुंद रस्ता तसेच आरक्षित भूखंडांच्या मंजुरीतील कथित अनियमिततांचा मुद्दा उपस्थित करत केकाण यांच्या निलंबनाची मागणी केली होती. सभागृह नेते सागर नाईक यांनीही या मागणीचे समर्थन केले. मात्र, विरोधी सदस्यांनी एकाच अधिकाऱ्याला लक्ष्य करण्याऐवजी मंजुरी प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. बांधकाम मंजुरीच्या प्रक्रियेत वरिष्ठ अधिकारी आणि आयुक्तांचाही सहभाग असल्याने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, विरोधकांच्या या आक्षेपानंतरही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करून घेतला होता.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५१ (१) अन्वये राज्य सरकारने हा ठराव तात्काळ निलंबित केला आहे. मात्र, हा अंतिम निर्णय नसून अधिनियमातील कलम ४५१ (२) आणि (३) नुसार महापालिका आयुक्तांना शासनासमोर आपले अभिवेदन सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ठराव कायम ठेवणे, त्यात बदल करणे, निलंबन रद्द करणे किंवा ठराव विखंडित करणे याबाबत शासन अंतिम निर्णय घेणार आहे. महासभेत बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला ठराव शासनाने निलंबित केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता महापालिका प्रशासन शासनासमोर कोणती भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
