नवी मुंबई : शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी उद्योगांना माफक दरात पुरवण्यात येणार असून यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी ही पाणी पुरवठ्याची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सात मलनि:सारण केंद्रांतून कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले प्रक्रियायुक्त पाणी वापराविना समुद्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जवळजवळ ३०७ कोटी रुपये खर्चातून टर्शिअरी ट्रीटमेन्ट प्रकल्प उभारले असून यातून प्रक्रियायुक्त ४० एमएलडी पाणी एमआयडीसीतील उद्योजकांना पुरवण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसीशी करार करण्यात आला असून यातून नवी मुंबई महापालिकेला १५ वर्षांत ४९४ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. तर भविष्यात या प्रकल्पांची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

हे प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसीला देण्यासाठी यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. पहिल्या टप्प्यात महापे एमआयडीसीला हे प्रक्रियायुक्त पाणी देण्याचा पालिकेचा निर्धार आहे. याबबत लवकरच एमआयडीसी प्रशासन व पालिका यांची संयुक्त बैठक होणार असून यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

लवकरच मीटर जोडणी

पुनर्प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसी क्षेत्रात पुरवले जाणार असून त्यासाठी एकूण ८३ किमी जलवाहिनी टाकली आहे. पालिकेकडून त्यांना १८.५० दराने पाणी मिळणार असल्याने कंपन्यांचा फायदा होणार असून पर्यावरणही जपले जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्याबाबत ठाणे बेलापूर औद्योगिक असोसिएशन, पालिका व पुरवठादार यांची पालिकेसोबत पुरवठ्याबाबत बैठक होणार असून मीटर जोडणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कोट

रबाळे, महापे, तुर्भे येथील काम पूर्ण करण्यात आले असून तुर्भे येथील रेल्वे लाइनखालून मायक्रोटनल करण्यात आले आहे. महापे एमआयडीसीला प्रक्रियायुक्त पाणी लवकरच देण्याचा श्रीगणेशाही होणार आहे. – अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका