नवी मुंबई : करोना टाळेबंदी व निर्बंधांमुळे गेले दीड वर्ष व्यवसाय करता न आल्याने सर्वाचीच आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. काही खासगी आस्थापनांनी व्यवसायिकांचे भाडे कमी केले असल्याने महापालिकेनेही आपल्या मालमत्तांमधील भाडेपट्टाधारकांच टाळेबंदी काळातील भाडे माफ करण्याची मागणी होत होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीतील त्यांचे भाडे पूर्णत: माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनामुळे मागील दीड वर्षांपासून सर्वच नागरिक, व्यापारी व भाडेपट्टाधारक आर्थिक संकटात आहेत. त्या कालावधीत आर्थिक व्यवहार मोठय़ा प्रमाणात बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले तर सामान्य नागरिकांनाही आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले.  नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिकेच्या मालकीचे १०३ अपंग स्टॉल, ९१ दुकान, गाळे, किऑक्स, ३ फुडकोर्ट/ उपाहारगृह, २ नौकाविहार, ९ तलाव, २२ आहार केंद्रे, ४३ समाजमंदिर, बहुउद्देशीय इमारती आणि व्यायामशाळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, जागा विविध प्रयोजनांसाठी ‘लीव्ह अ‍ॅण्ड लायसन’ तत्त्वावर भाडेपट्टय़ाने दिलेल्या आहेत. टाळेबंदी कालावधीत सर्व व्यवहार बंद असल्याने महापालिकेच्या मालमत्तांमधील अनुज्ञाप्तीधारकांनी टाळेबंदी कालावधीतील भाडे माफ करण्याबाबत महानगरपालिकेस विनंती केलेली होती.

त्यामुळे महापालिका प्रशासनानेकायदेशीर तरतुदी व मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करीत सहा महिन्यांचे त्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला या सहा महिन्यांच्या भाडय़ापोटी ५४  लाख ८० हजार ०७८ एवढे भाडे येणे अपेक्षित होते. ते १०० टक्के माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचे भाडेपट्टाधारकांनी स्वागत केले आहे.

महापालिकेच्या मालमत्तांमध्ये असलेल्या भाडेपट्टा करारावर असलेल्यांना करोनाकाळात टाळेबंदीमधील पहिल्या ६ महिन्यांचे भाडे पूर्णत: माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यामुळे या वर्गाला दिलासा देण्याचे काम पालिकेने दिले आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका